बीड ( लातूर) : प्रधानमंत्री ग्रामसडक योजना जवळला फाटा ते पाटोदा अंतर्गत करण्यात आलेल्या तब्बल ६.६१ कोटींच्या रस्ता कामात निकृष्ट दर्जा, सबलेट पद्धती आणि अंदाजपत्रकविरोधी काम झाल्याच्या तक्रारीवर आजवर कोणतीच कार्यवाही न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ड. नरसिंह लक्ष्मणराव जाधव आणि शेख मोबिन यांनी ५ डिसेंबर २०२५ रोजी तहसील कार्यालय, पाटोदा येथे एकदिवसीय उपोषण करण्याची घोषणा केली आहे.
कार्यकारी संबंधित बीडचे अभियंता यांनी पावसाळा संपल्यानंतर चांगल्या दर्जाच्या ठेकेदाराकडून नव्याने मानकाप्रमाणे रस्ता करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र पावसाळा संपूनही दुरुस्ती, पुनर्बांधणी किंवा कोणतीही कारवाई न झाल्याने जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेकवेळा या बाबतीत आवाज उठविला मात्र यावर अद्यापही कुठलीही ठोस भूमिका संबंधित विभागाने न घेतल्याने ५ डिसेंबरला थेट उपोषण करणार असल्याचा इशारा जाधव यांनी दिला असून या प्रकरणी प्रशासकीय व फौजदारी कारवाई, वाया गेलेल्या निधीची सरकारी तिजोरीत भरपाई, रस्ता अंदाजपत्रक याप्रमाणे नव्याने बांधणे या मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ग्रामविकास मंत्रालयापर्यंत सर्व स्तरांवर केल्या आहेत. मात्र काहीच प्रतिसाद न मिळाल्याने आता आंदोलनाशिवाय मार्ग उरला नसून हे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आता १६ नोव्हेंबर रोजी तहसीलदार व PMGSY अधिकाऱ्यांना यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनावर राष्ट्रवादी श.प. तालुकाध्यक्ष आनंद जाधव उभा. ठा. तालुकाध्यक्ष मुकुंद शिंदे, काँग्रेस तालुकाध्यक्ष राहुल जाधव, भाई विष्णुपंत घोलप, मुखराम पठाण, रियाज सय्यद, महादेव जाधव, सय्यद आमेर सय्यद यासीन सय्यद अर्षद, राजेंद्र जाधव आणि इतर २६ नागरिकांच्या सह्या आहेत. जवळला फाटा-पाटोदा रस्त्याच्या बोगस कामाविरोधातील हे उपोषण प्रशासनाचे लक्ष वेधेल, असा विश्वास ड. नरसिंह जाधव यांनी व्यक्त केला आहे.