Larvae found in Vanvewadi's nutritious meal!
कडा, पुढारी वृत्तसेवा आष्टी तालुक्यातील वनवेवाडी येथील अंगणवाडीमध्ये चिमुकल्या बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या खिचडीत चक्क अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
वनवे वाडी येथील अंगणवाडीतून गुरुवारी अंगणवाडीतील एक बालक खिचडीचा डबा घरी घेऊन गेले. बालक घरी खिचडी खात असताना त्यामध्ये अळी आढळून आली. हा प्रकार पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. यानंतर बालकाचे वडील गणेश राजेंद्र बनसोडे यांनी संबंधित खिचडीचे छायाचित्र घेऊन 'पत्रकारांशी संपर्क साधला.
तसेच या प्रकाराबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे ऑनलाइन तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले. पालकांच्या म्हणण्यानुसार, अंगणवाडीच्या पोषण आहाराबाबत यापूर्वीही तक्रारी झाल्या असून, वारंवार अशा प्रकारे बालकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे केवळ संबंधित घटनेची चौकशी करून हा विषय संपवण्याऐवजी अंगणवाडीतील पोषण आहाराची गुणवत्ता, स्वच्छता, साठवणूक आणि वितरण व्यवस्थेची सखोल तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच संबंधित महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने अंगणवाडीची पाहण करावी, उपलब्ध अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठ घ्यावेत आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कठो कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संबंधित पालकांनी आमच्याकडे तक्रार केलेली नाही. हा प्रकार कालच निदर्शनास आणून दिला असता तर खिचडीचे नमुने तपासणीसाठी पाठवले असते. अंगणवाडीतील खिचडी घरी देण्यात येत नाही. त्यामुळे घरी गेल्यानंतर अळी पडली की खिचडीमध्ये आधीपासूनच होती, याबाबत सध्या स्पष्टता करता येणार नाही. याप्रकरणी सुपरवायझरला अंगणवाडीमध्ये पाठवून तपासणी करण्यात येईल. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात येतील