केज : जमिनीचे सीमांकन करून देण्याचे लेखी आश्वासन देऊनही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शब्द न पाळल्याने केज तहसील कार्यालयात सोमवारी (दि. 12) सायंकाळी मोठा थरार घडला. जमिनीच्या वादातून हवालदिल झालेल्या एकाच कुटुंबातील सात जणांनी तहसील कार्यालयासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी, या घटनेमुळे प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे. विष्णू लांडगे, महादेव लांडगे, शंकर लांडगे, बळी लांडगे, शांताबाई नेहा, संध्या लांडगे व सोजर लांडगे (सर्व रा. केज) अशी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्यांची नावे आहेत.
विष्णू लांडगे व त्यांच्या पाच भावांना सर्व्हे नंबर 30/1 व 30/2 मधील जमिनीचे न्यायालयाच्या हुकूमनाम्यानुसार (दिवाणी दावा क्र. 75/2024) वाटप झाले आहे. यानुसार तहसील कार्यालयाने 13 मार्च 2025 रोजी मोजणीचे आदेश दिले होते. मात्र, 8 डिसेंबर 2025 रोजी मोजणीसाठी गेले असता, अतिक्रमण करणाऱ्यांनी विरोध केल्याने मोजणी थांबली.
याविरोधात लांडगे कुटुंबीयांनी 8 ते 12 डिसेंबर दरम्यान उपोषण केले होते. त्यावेळी तहसीलदारांनी ‘12 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत सीमांकन करून देऊ,’ असे लेखी आश्वासन दिले होते. सोमवारी दुपारी 3 वाजून गेले तरी प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झाली नाही. अखेर संयम सुटल्याने सायंकाळी 4 वाजता लांडगे कुटुंबीयांनी थेट तहसील कार्यालयात घुसून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी झटापट करून आंदोलकांना रोखले.
...तर प्रशासनाला जबाबदार धरू!
न्यायालयाचा अंतिम हुकूम असूनही प्रशासन मोजणी करत नाही. आम्ही चार दिवस उपोषण केले, त्यावेळी 3 वाजेपर्यंत मोजणीचे लेखी आश्वासन दिले होते. पण अधिकारी फिरकलेच नाहीत. अतिक्रमणकर्त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनामुळेच आमच्यावर लेकराबाळांसह जीव देण्याची वेळ आली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया विष्णू लांडगे यांनी व्यक्त केली. महिला आणि लहान मुलांसह आम्ही तहसीलच्या उंबरठ्यावर बसलो आहोत. आम्हाला न्याय हवा आहे, असे पीडित प्रियांका लांडगे यांनी सांगितले.