बीड : पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथील श्री क्षेत्र निरंजन संस्थानचे महंत ह. भ. प. श्री. कृष्णा महाराज शास्त्री यांची श्री क्षेत्र भगवानगडाचे चतुर्थ उत्तराधिकारी (महंत) म्हणून घोषणा झाली आहे. भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी त्यांचा पुढील उत्तरधिकारी म्हणून कृष्णा महाराज शास्त्री यांची निवड केली. सोमवारी (दि. १४) सकाळी ८ वाजता एकनाथवाडी येथून ग्रामस्थांनी कृष्णा महाराज यांना रथामध्ये बसवून ढोल, ताशा, टाळ, मृदंगाचा गजर आणि हरी नामाचा जयघोष करत भगवानगडावरती नेले.
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाच्या २०२६ मध्ये होणाऱ्या अमृत महोत्सवावेळी भगवानगडाचे महंत म्हणून गादीवर विराजमान होतील. कृष्णा महाराज मूळचे तेलंगणातील असून १२ वर्षांपूर्वी भगवानगडावरती आले. ज्ञानेश्वरीचे संपूर्ण शिक्षण भगवानगडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठामध्ये झाले. त्यांचे एमए पर्यंतचे शिक्षण झालेले आहे. त्यांनी बारा वर्षे ज्ञानेश्वरीचे संपूर्ण शिक्षण डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्याकडून घेतले आहे. तीन वर्षांपासून एकनाथवाडी येथील निरंजन संस्थेत महंत म्हणून राहत होते.
कृष्णा महाराज शास्त्री यांचे एकनाथवाडी पासून निघाल्यानंतर रस्त्यामधील मुंगसवाडे, श्रीपतवाडी, मालेवाडी, खरवंडी कासार, किर्तनवाडी या ठिकाणी लोकांनी भव्य असे स्वागत केले. काही ठिकाणी जेसीबीतून फुलांचा वर्षावही करण्यात आला. श्री संत भगवान बाबा की जय, नामदेव महाराज शास्त्री की जय, अशा घोषणा देत सर्व भाविक मंडळी भगवान गडाकपर्यंत पोहचले.