केज:- हेवा दावे आणि भांडण तंट्या पासून आता अध्यात्मासारखे पवित्र क्षेत्र सुद्धा दूर राहिले नसून मठाचे उत्तराधिकारी म्हणून ज्यांची नियुक्ती केली त्यांनीच मारहाण करून भजनाचे टाळ आणि हिशोबाच्या वह्या घेऊन गेले असल्याने त्यांच्या पासूनच जिवाला धोका असल्याची तक्रार चक्क मठाधिपती यांनी पोलिसात केली आहे. तर या प्रकरणी गुन्हा दाखल झालेले उत्तराधिकारी म्हणतात असे काही घडलेच नाही.
दि. १३ मे रोजी बीड जिल्ह्यातील सासुरा तालुका केज येथील संत एकनाथ महाराज मठाचे मठाधिपती हभप रतन महाराज या १०४ वर्ष वयाच्या महाराजांनी त्यांनी मठाचे नेमलेले उत्तराधिकारी ह.भ.प. केशव महाराज गित्ते शास्त्री यांच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. ११ मे रोजी ते मठाचे बाजुस असेलेल्या रुम असताना त्या ठीकाणी केशव गिते, नाथराव गिते (रा. नंदागौळ ता. परळी) मनोहर सुर्यभान पाळवदे, गजेंद्र महादेव लोंढे, नारायण प्रभाकर पाळवदे, शांताबाई मनोहर पाळवदे, सर्व (रा. सासुरा ता. केज ) हे मठामध्ये येवुन त्यांना म्हणाले, की, तुम्ही केशव गिते यांना उत्तराधिकारी या पदावर केलेली निवड का रद्द केली ? अशी कुरापत काढुन शिविगाळ करुन जिवे मारण्याच्या धमक्या देवुन धक्का बुक्की करुन निघुन गेले.
त्यामुळे त्यांचा बी पी वाढल्यामुळे ते त्यांच्या ड्रायव्हर केशव उगले याला सोबत घेऊन बरडफाटा येथील नित्यसेवा हॉस्पीटल खाजगी दवाखाण्यात उपचाराकरीता गेले. हॉस्पीटलमध्ये उपचार करुन ते दि. १२ मे रोजी दुपारी वाजता परत मठात आले असता त्यांना अमोल मधुकर पाळवदे, प्रमोद जिवन उगले, सचीन रामराव उगले यांनी त्यांना सांगीतले की, तुम्ही इथुन बाहेर गेल्यावर सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास गावातील सर्व लोकांनी सहा महिण्या पुर्वी अणुमाई मठास लावलेले कुलुप तोडुन केशव नाथराव गिते, नाथराव गिते (रा. नंदागौळ ता. परळी), मनोहर सुर्यभान पाळवदे, गजेंद्र महादेव लोंढे, नारायण प्रभाकर पाळवदे, शांताबाई मनोहर पाळवदे, सर्व (रा. सासुरा) हे मठा मधील टाळ, महत्वाचे कागदग-पत्रे आणि रोख १० हजार रु. घेऊन गेले.
या प्रकरणी केशव नाथराव गिते, नाथराव गिते, मनोहर सुर्यभान पाळवदे, गजेंद्र महादेव लोंढे, नारायण प्रभाकर पाळवदे आणि शांताबाई मनोहर पाळवदे, या सहा जणांच्या विरुद्ध गु र नं २८७/२०२६ भा न्या सं ११९(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हेडकॉन्स्टेबल राजू वंजारे हे पुढील तपास करीत आहेत.
या प्रकरणी ह.भ.प केशव महाराज गित्ते हे प्रतिनिधीशी मोबाईल वरून बोलताना म्हणाले की, रतन महाराज यांना भेटण्यासाठी माझे आई वडील आले होते. पूर्वी रतन महाराज यांनी त्यांना ज्या उद्देशाने उत्तराधिकारी म्हणून आणले होते त्या संदर्भात त्यांना बोलण्यासाठी आले होते. परंतु असा काही प्रकार घडलेला नसताना त्यांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे.