गौतम बचुटे
केज : जमिनीच्या फेरफार नोंदीसाठी शेतकऱ्याकडे आठ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना उमरी सज्जाचे ग्राममहसूल अधिकारी परमेश्वर फलके यांना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरुवारी (दि. ८) केज तहसील कार्यालयाच्या आवारात रंगेहाथ ताब्यात घेतले.
केज तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या जमिनीची फेरफार नोंद घेण्यासाठी ग्राममहसूल अधिकारी परमेश्वर फलके यांनी त्याच्याकडे लाचेची मागणी केली होती. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित शेतकऱ्याने बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची प्राथमिक चौकशी करून एसीबी पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यानंतर गुरुवारी केज तहसील कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला. तक्रारदार शेतकऱ्याकडून आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्राममहसूल अधिकारी परमेश्वर फलके यांना पथकाने रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक समाधान कवडे, अनिल शेळके, अविनाश गवळी, पांडुरंग काचंगुंडे आणि चालक गणेश म्हेत्रे यांच्या पथकाने केली.