केज : पंधरा दिवसांवर घरात मुलीचे लग्न आले असल्याने अहिल्यानगर येथे कपड्याची खरेदी करायला निघालेल्या नातेवाईकांच्या जीपला एका आयशर टेम्पोने धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात वधूच्या वडिलांचा आणि वराच्या मावशीचा मृत्यू झाला. तर वधुचे चुलते आणि भाऊ यांच्यासह ड्रायव्हर जखमी झाले आहेत. (Beed Accident News)
केज तालुक्यातील कासारी येथील रामेश्वर डोईफोडे यांच्या मुलीचे २३ फेब्रुवारी रोजी लग्न असल्याने ७ फेब्रुवारी रोजी केजकडून अहिल्या नगरकडे जात असताना सकाळी ८ च्या सुमारास केज-मांजरसुंबा महामार्ग क्र. ५४८-डी वर केज तालुक्यातील सांगवी (सारणी) पुलाजवळ सकाळी ८ च्या सुमारास मांजरसुंब्या कडून भरधाव येणाऱ्या आयशर टेम्पो (टी एस-०१/यु सी-५५०२) ने बोलेरो जीप (एम एच-१६/ए टी-००६२) ला जोराची धडक दिली. त्यानंतर तो टेम्पो पुलाच्या भिंतीला धडकला.
या अपघातात जीप मधून मुलीच्या लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी अहिल्यानगर येथे जात असलेल्या नवरदेवाची मावशी उर्मिला उर्फ उमा श्रीराम घुले (रा. कोरेगाव ह. मु. शिक्षक कॉलनी केज ता. केज) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघात जखमी झालेले नवरी मुलीचे वडील रामेश्वर डोईफोडे यांचा अंबाजोगाई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच या अपघातात नवरी मुलीचे चुलते सहशिक्षक लक्ष्मण डोईफोडे आणि भाऊ प्रवीण डोईफोडे यांच्यासह जिपचा चालक असे तिघे जखमी झाले आहेत. लक्ष्मण डोईफोडे आणि प्रवीण डोईफोडे या दोघांवर अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू असून जीपचा ड्रायव्हर याच्यावर बीड येथे उपचार सुरू आहेत.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वैभव पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू वाघमारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय बीक्कड, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू वंजारे, पोलीस जमादार संतोष गित्ते यांच्यासह पोलीस अपघातस्थळी पोचले आणि त्यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले.
अपघात मृत्यू झालेले रामेश्वर डोईफोडे यांची कन्या मनीषा आणि मूळचे पिसेगाव येथील तुकाराम नेहरकर यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर नेहरकर यांच्या सोबत दि. २३ फेब्रुवारी रोजी केज येथे विवाह आयोजित केला होता. या अपघातामुळे आता मुलीचे गाव कासारी, वराच्या मावशीचे गाव कोरेगाव आणि वराच्या पिसेगाव या गावात शोककळा पसरली आहे.