Kej Accident | चंदनसावरगावजवळ कार पुलाच्या कठड्याला धडकून दोन ठार ; एक गंभीर जखमी! 
बीड

Kej Accident | चंदनसावरगावजवळ कार पुलाच्या कठड्याला धडकून दोन ठार ; एक गंभीर जखमी!

पुढारी वृत्तसेवा

केज: केज-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री एक अत्यंत भीषण व दुर्दैवी अपघात घडला. चंदनसावरगाव शिवारातील सुतार शेत परिसरात भरधाव वेगात जाणारी कार पुलाच्या सिमेंट कठड्याला जोरदार धडकल्याने कारमधील दोन जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. मयत दोघेही जवळबन येथील रहिवासी असून या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केज येथून जवळबन गावाकडे जाणाऱ्या कारमधून तिघे मित्र प्रवास करत होते. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही कार चंदनसावरगाव शिवारातील सुतार शेत परिसरातील पुलाजवळ आली असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार थेट पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आणि तिघेही वाहनात अडकले.

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार केशव खाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून स्वामी रामानंद तीर्थ (स्वाराती) ग्रामीण रुग्णालय, अंबाजोगाई येथे उपचारासाठी हलवले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून प्रमोद उर्फ सुंदर उत्तम सातपुते (वय ४५ वर्षे) आणि प्रशांत उर्फ महादेव दिगंबर करपे (वय ४८ वर्षे, दोघे रा. जवळबन) यांना मृत घोषित केले. या अपघातात गंभीर जखमी झालेले दत्ता तपसे (वय ४३ वर्षे, रा. चंदनसावरगाव) यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघातानंतर कार रस्त्यावर आडवी पडल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलीस जमादार केशव खाडे यांनी कोणतीही वेळ न दवडता तातडीने तिन्ही जखमींना रुग्णालयात रवाना केले. त्यानंतर स्थानिक पातळीवरून जेसीबी मशीन बोलावून अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला सारली आणि राष्ट्रीय महामार्गावरील खोळंबलेली वाहतूक तात्काळ सुरळीत केली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT