Karuna Munde vs Dhananjay Munde Update
मुंबई : राज्याचे माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यांची पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांनी केलेल्या दाव्यानुसार, मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांनी करुणा यांना आणि तिच्या मुलीच्या खर्चाची द्यायची रक्कम न्यायालयात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी कनिष्ठ न्यायालयातील एक याचिका रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र तिथे त्यांना अपेक्षित दिलासा मिळाला नसल्याचे करुणा यांनी म्हटले आहे.
करुणा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांनी गुरूवारी (दि.१९) मला दिलासा दिला आहे. माझ्या अंदाजे ३५ ते ४० लाख रुपयांच्या रक्कमेपैंकी ५० टक्के रक्कम, म्हणजेच सुमारे २१ ते २२ लाख रुपये आणि माझ्या मुलीच्या देखभालीची १०० टक्के रक्कम (अंदाजे २६ लाख रुपये) न्यायालयात जमा करण्याचे आदेश कोर्टाने धनंजय मुंडेंना दिले आहेत."
करूणा यांनी पुढे आरोप केला आहे की, "मुंडेंना मला पैसे द्यायचे नाहीत, म्हणूनच ते कोर्टात गेले. माझ्याकडे ५० कोटी रुपयांची प्रॉपर्टी होती, ती मला विकावी लागली. निवडणुकीच्या वेळी मी माझं मंगळसूत्र देखील त्यांच्यासाठी गहाण ठेवून त्यांना पैसे दिले होते."
धनंजय मुंडे यांच्यावर आणि त्यांच्या काही निकटवर्तीयांवरही करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले आहेत. "मी धनंजय मुंडे यांना २७ वर्षांपासून ओळखते. त्यांना पैशांची काही गरज नाही, पण त्यांच्यामागे असलेली दलाल गँग त्यांना चुकीचे वागायला लावत आहे," असे म्हणत तिने वाल्मिक कराड आणि तेजस ठक्कर या व्यक्तींची नावे घेतली. कृष्णा आंधळे नावाच्या व्यक्तीबद्दल बोलताना, "कृष्णा आंधळेचा खून झाला असेल, तो अजून सापडत नाही याचा अर्थ त्याचा खून झाला असणार," अशी धक्कादायक शंकाही तिने व्यक्त केली. "वाल्मिक कराडला येरवडा जेलमध्ये पाठवण्यासाठी माझे कार्यकर्ते अजित पवारांना सातत्याने निवेदन देत आहेत," असेही करुणा यांनी सांगितले.
पूर्वीच्या संबंधांबद्दल आणि सद्यस्थितीबद्दल बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या, "मुंडे जोपर्यंत माझ्यासोबत याच घरात ६ वर्षे राहत होते, तोपर्यंत ते कांदा-लसूण सुद्धा खात नव्हते. परंतु काही दलाल त्यांच्यासोबत आल्यानंतर आमच्यात फूट पडली. त्यांनी विचार करायला पाहिजे, पण त्यांचं डोकं कुठं गेलं काय माहीत. मी प्रेमिका म्हणून मुंडे यांच्यासोबत राहत होते. मुंडे कोर्टात वाद घेऊन गेले, मी कोर्टात गेले नव्हते. मला त्यांची प्रॉपर्टी किती आहे हे सुद्धा माहिती नव्हतं."
दरम्यान बोलताना धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांनी थेट आव्हान दिले आहे की, "थोडी जरी लाज असेल, तर निवडणुकीत माझ्याकडून घेतलेले पैसे मला परत दे. दलाल लोकांचे ऐकू नका." आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, "घाणेरडे लोक ज्यांचे फोटो बॅनरवर आहेत, त्यांना निवडून देऊ नका," असे आवाहनही तिने जनतेला केले आहे.