धारूर : धारूर तालुक्यातील कारी येथे ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. योजनेची कामे कागदावरच पूर्ण दाखवून लाखो रुपयांची बिले हडपल्याचा आरोप करण्यात येत असून, याप्रकरणी संबंधित गुत्तेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मुजमुले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारी गावासाठी मंजूर करण्यात आलेली ‘जल जीवन मिशन’ची कामे अंदाजपत्रकानुसार पूर्ण करण्यात आलेली नाहीत. प्रत्यक्ष जमिनीवर काम अपूर्ण असतानाही, अधिकाऱ्यांच्या संगनमताने काम पूर्ण झाल्याचे दर्शवून निधीची उचल करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकलेली नाही, तर काही प्रभागांत अद्याप पाण्याचा थेंबही पोहोचलेला नाही. ‘हर घर जल’चा नारा देणाऱ्या या योजनेचा बोजवारा उडाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
चौकशीची मागणी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित कामाचे मेजरमेंट बुक (चइ), अंदाजपत्रक (इजट) आणि प्रत्यक्ष झालेले काम यांची तांत्रिक समितीमार्फत सखोल चौकशी व्हावी. यामध्ये मोठी तफावत असण्याची शक्यता असून, दोषी आढळणाऱ्या अभियंत्यांवर आणि गुत्तेदारावर तत्काळ गुन्हे दाखल करावेत.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता नसल्यामुळे शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून उमटत आहे. आता या प्रकरणात प्रशासन दोषींवर कारवाई करून ग्रामस्थांना पाणी मिळवून देणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
जनता दरबारात प्रशासनाची दखल या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जनता दरबारात स्पष्ट केले की, जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर कामे जर अंदाजपत्रकानुसार पूर्ण झाली नसतील, तर त्याची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक प्रशासकीय व कायदेशीर कारवाई केली जाईल.
आमरण उपोषणाचा इशारा कारी गावात सध्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. एकीकडे जनता पाण्यासाठी वणवण भटकत असताना दुसरीकडे काम पूर्ण न करताच बिले उचलली जात आहेत. हा सर्वसामान्य जनतेच्या पैशाचा अपहार आहे. जर संबंधितांवर फौजदारी कारवाई झाली नाही, तर मी जिल्हा परिषद, बीड कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे.मिलिंद मुजमुले (सामाजिक कार्यकर्ते)