केज : आधीच पावसाअभावी हाता तोंडाशी आलेले पीक घटले, त्यात कष्टाने पिकवून काढणी केलेल्या सोयाबीनला आगीच्या संकटाने घेरले. केज तालुक्यातील टाकळी येथे सोयाबीनच्या गंजींना आग लागण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, पुन्हा चार शेतकऱ्यांचे सोयाबीन जळून खाक झाले आहे.
सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेत सुमारे १४ लाख रुपयांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे, पाच दिवसांत सोयाबीनच्या गंजी जळण्याची ही सहावी घटना असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच दुष्काळाने आर्थिक कंबरडे मोडलेले असताना हाती आलेले पीकही आगीत भस्मसात झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
टाकळी येथील शिवाजी कोंडीबा बारगजे, राजेंद्र कोंडीबा बारगजे, शंकर कोंडीबा बारगजे आणि दशरथ कोंडीबा बारगजे या चार शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी करून शेतात गंजी रचून ठेवली होती. सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास या गंजीला आग लागली.
शेतकऱ्यांसह शेजारी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्र रूप धारण केल्याने सोयाबीन वाचविण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. या घटनेत चारही शेतकऱ्यांचे सोयाबीन जळून खाक झाले असून, सुमारे १४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
पाच दिवसांत सहावी घटना; नेमके कारण काय?
टाकळी परिसरात सोयाबीनच्या गंजीला आग लागण्याच्या घटनांची मालिका सुरूच आहे. ७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास बाबासाहेब वैजनाथ घुले यांच्या सोयाबीनच्या गंजीला आग लागली होती. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गिरजाबाई बाबासाहेब घुले यांच्या सोयाबीनच्या गंजीला आग लागली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चार शेतकऱ्यांच्या गंजी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या घटनांमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.