केज : दारूच्या नशेत एका तरुणाने थेट ११Kv च्या विद्युत खांबावर चढून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याने केज तालुक्यातील सांगवी परिसरात शनिवारी (दि.१२) सायंकाळी मोठी खळबळ उडाली. तब्बल ३ तास चाललेल्या या थरार नाट्यानंतर, अखेर पोलीस आणि स्थानिक तरुणांनी प्रसंगावधान दाखवत त्याला सुखरूप खाली उतरवले. वसंत केदार असे या तरुणाचे नाव आहे.
ही घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास केज-बीड रस्त्यावरील मस्साजोग जवळ घडली. वसंत केदार हा दारूच्या नशेत एका पवन ऊर्जा केंद्राजवळ असलेल्या ११ केव्ही क्षमतेच्या वीजवाहक खांबावर चढला. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून महावितरणने तात्काळ त्या भागातील वीजपुरवठा खंडित केला, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
खांबावर चढलेला वसंत खाली उतरण्यास तयार नव्हता आणि तिथून उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी देत होता. त्याला वाचवण्यासाठी दोन स्थानिक तरुणही खांबावर चढले, मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार शहादेव मेहेत्रे आणि शिवाजी कागदे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गावकऱ्यांशी संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात आणली. अखेर रात्री १० वाजण्याच्या सुमारास, काही धाडसी तरुणांच्या मदतीने पोलिसांनी वसंतच्या कमरेला दोर बांधून त्याला अत्यंत शिताफीने आणि सुखरूप खाली उतरवले.
स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत केदार हा दारूच्या आहारी गेला असून, अवास्तव मागण्यांसाठी अशा प्रकारचे कृत्य करण्याची ही त्याची पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्याने असे प्रकार केले आहेत. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.