गौतम बचुटे
केज : निसर्गोपचार, योगा आणि अक्युपंकचर यासारख्या पॅरामेडिकल शाखेत शिक्षण झालेले एका महाठगाने चक्क मुन्नाभाई एमबीबीएस सारखा बनवाट डॉक्टर बनून अनेक वर्षांपासून केज तालुक्यातील ग्रामीण भागात रुग्णांच्या जीविताशी खेळून पैसे कमवीत होता. प्रमाणपत्रातील अक्षरांची बनवाबनवी करून सुनील बन याने डॉक्टर असल्याची बनावट पदवीच आपल्या क्लिनिकमध्ये लावली होती.
नोंदणी केज तालुक्यातील बोरगाव (बु.) येथे विलास भागवत बन वय (46 वर्षे) (रा. कळंब ता. कळंब जि. धाराशिव) हा इसम महाराष्ट्र वैद्यकीय कायद्या अंतर्गत परवाना न घेता किंवा न करता औषध कायद्यातील आवश्यक परवानगी न घेता त्याचे उल्लंघन करून बोगस प्रमाणपत्र वापरुन औषधोपचाराच्या नावाखाली रुग्णांच्या जीविताशी खेळत होता.
त्याची माहिती मिळाल्या नंतर तालुका स्तरीय समितीतील सदस्य केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल मुंडे, आरोग्य विस्तार अधिकारी सौ. छाया जाधव हे पोलीस निरीक्षक राहुल सुर्यतळ यांचे आदेशाने केज पोलीस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल गोरख फड, बाबजे दराडे हे सरकारी वाहनाने बोरगाव (बु.) गेले. तेथे हनुमान मंदीर समोर भास्कर गव्हाणे यांचे माळवदाचे गाळ्यामध्ये विलास बन हा रुग्णावर बेकायदेशीरपणे अवैधरित्या एका महिला रुग्णावर उपचार करीत होता. पथकाने त्याच्याकडे वैद्यकीय परीषदेच्या प्रमाणपत्राची आणि वैद्यकीय शिक्षणाच्या पदवीची मागणी केली असता त्याने प्रमाणपत्र नसल्याचे सांगितले.
तो उपचार करीत असलेल्या गळ्यातील भिंतीवर लावलेले प्रमाणपत्र अधिकाऱ्यांनी पाहीले असता ते बोगस व बनावट असल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले. पथकांनी तेथे बोगस डॉक्टर विलास बन आणि तो उपचारासाठी वापरत असलेले बेकायदेशीर औषध साठा व साहित्य ताब्यात घेतले. या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल मुंडे यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षिरसागर हे तपास करीत आहेत.
खुबीने केले बनावट वैद्यकीय शिक्षणाचे प्रमाणपत्र
वैद्यकीय उपचार करण्यासाठी आयुष अंतर्गत पाच अधिकृत पॅथी आहेत. मात्र बन याच्याकडे त्याने निसर्गोपचार, योगा आणि अक्युपंकचर यासारख्या पॅरामेडिकल शाखेत शिक्षण झालेले आहे. त्याचा वापर करून त्याने बीएमएस असे ठळक इंग्रजी अक्षरातील प्रमाण पत्र तयार करून तो आयुर्वेदाचा पदवीधर असल्याचे भासवून बेमालूमपणे औषधोपचार करीत होता. बोगस डॉक्टर विलास बन याच्यावर कारवाई झाल्याचे समजताच अनेकजण धास्तावले असून अनेकजण आठवडी बाजारात आणि खेड्यापाड्यात औषधोपचार करीत असल्याची चर्चा सुरू आहे.
पंधरा दिवसांपूर्वी झाली होती तक्रार
विलास बन हा बोगस असून रुग्णांना फसवून व त्यांच्या जीविताशी खेळून फसवणूक करीत असल्याची लेखी तक्रार तालुका अधिकारी डॉ. राहुल मुंडे यांच्याकडे दि. 12 ऑक्टोबर रोजी एका सुज्ञ नागरिकाने तक्रार केली होती. तक्रार प्राप्त झाल्या नंतर बोगस डॉक्टरने दर्शनी भागात लावलेले बनावट वैद्यकीय व्यवसायाचे प्रमाणपत्र याची पडताळणी केले असता ते बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने बोगस डॉक्टर विलास भागवत बन विरुद्ध तक्रार दाखल करण्याचे पत्र मिळाले होते.