नेकनुर: बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील लिंबागणेश परिसरात रिलायन्स जिओ मोबाईल नेटवर्क सेवा गेल्या महिनाभरापासून वारंवार खंडित आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नेटवर्क रेंज पूर्ण दिसत असतानाही इंटरनेट बंद पडणे, कॉल न लागणे व कॉल ड्रॉप होणे यासारख्या गंभीर तांत्रिक समस्यांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे ग्रामस्थांनी टॉवरवर चढून लक्षवेधी आंदोलन केले पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
नेटवर्क नसल्याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाला, बँक व डिजिटल व्यवहारांना, व्यापारी उलाढालींना तसेच आरोग्य व शासकीय सेवांना बसत आहे. इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने ऑनलाईन पेमेंट, पैसे ट्रान्सफर व सरकारी पोर्टलवरील कामे ठप्प झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर जिओ कंपनीने तातडीने नेटवर्क सेवा सुरळीत करावी, कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात व तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तसेच बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी सकाळी लिंबागणेश येथील जिओ टॉवरवर चढून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
महसूल व पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. निवेदन लिंबागणेश पोलिस चौकीचे सहाय्यक फौजदार राठोड, मंडळ अधिकारी पंडित नाईकवाडे व तलाठी पोतदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व नेकनूर पोलिस स्टेशन यांना देण्यात आले.
या आंदोलनात सरपंच बालासाहेब जाधव, सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ, शिवशक्ती–भीमशक्ती विचारमंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, ग्रामपंचायत सदस्य दामोदर थोरात, सुरेश निर्मळ, मधुकर थोरात, सर्पमित्र अशोक जाधव, औदुंबर नाईकवाडे, विक्रांत वाणी, सोनाजी शिंदे, सोनाजी कुदळे, संजय पावले,केशव गिरे आदी उपस्थित होते. दरम्यान, जिओ कंपनीच्या ढिसाळ सेवेविरोधात ग्रामस्थांनी बहिष्काराचा निर्धार व्यक्त केला असून अनेक युवकांनी आपली जिओ सिमकार्डे इतर कंपन्यांकडे पोर्ट करण्यास सुरुवात केली आहे. तातडीने सेवा सुधारली नाही, तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.