केज : संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या केज तालुक्यात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील केकतसारणी येथे चक्क शासकीय पाझर तलावातच अवैध खदान खोदून कोट्यवधी रुपयांच्या गौण खनिजाचे उत्खनन करण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, एका जागरूक नागरिकाने तक्रार करूनही प्रशासनाला तब्बल दीड महिन्यानंतर जाग आली, ज्यामुळे स्थानिक महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
केकतसारणी येथील गट नंबर ३६ आणि २४ मध्ये शासनाने २०१६ साली २.९० हेक्टर जमीन संपादित करून पाझर तलाव निर्माण केला होता. मात्र, याच तलावाशेजारी एका सत्ताधारी नेत्याशी संबंधित व्यक्तीने खडी क्रेशर सुरू करून, त्यासाठी लागणारे गौण खनिज थेट तलावातूनच उपसण्यास सुरुवात केली. या अवैध उत्खननामुळे तलावाची खोली ६० फुटांपर्यंत गेली असून, शेतकऱ्यांच्या सिंचनाचा आणि गुरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. क्रेशरच्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
या गंभीर प्रकाराबाबत रमाकांत धायगुडे या नागरिकाने ७ मे रोजी तहसीलदारांकडे लेखी तक्रार केली होती. मात्र, महसूल प्रशासनाने तब्बल ४७ दिवसांनी, म्हणजेच २४ जून रोजी घटनास्थळाचा पंचनामा केला. या पंचनाम्यात १५० फूट लांब, १०० फूट रुंद आणि ४० फूट खोल खड्डा आढळल्याचे नमूद केले, परंतु उत्खनन केलेल्या दगडाचा आणि गौण खनिजाचा उल्लेख सोयीस्करपणे टाळल्याचा आरोप होत आहे. पंचनाम्यापूर्वी अधिकारी आणि अवैध उत्खनन करणारे यांच्यात गुप्त बैठक होऊन जेसीबी आणि टिप्परसारखी वाहने हटवण्यात आल्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे केज तालुक्यात खळबळ उडाली आहे. तक्रार देऊनही कारवाईस झालेला विलंब आणि पंचनाम्यातील त्रुटींमुळे महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त होत आहे. या अवैध उत्खननामागे नेमके कोणते राजकीय लागेबांधे आहेत आणि जिल्हा प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.