बीड, पुढारी वृत्तसेवा असीम सरोदे कोण आहेत, हे मला माहीत नाही. माझा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. सध्या कुणीही उठसूट माझ्यावर आरोप करत आहे, अशा शब्दांत आमदार सुरेश धस यांनी आपल्यावरील आरोपांचे खंडन केले. आष्टी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते राम खाडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी होत असलेल्या आरोपांवर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. ते मस्साजोग येथे पत्रकारांशी बोलत होते.
आष्टी येथील राम खाडे यांनी आ. धस यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामागे धस यांचा हात असल्याचा आरोप खाडे कुटुंबीयांनी केला होता. यावर बोलताना घस म्हणाले, राम खाडे यांचे भांडण एका धाब्यावर झाले होते. त्या वादातूनच त्यांच्यावर हल्ला झाला आहे.
या घटनेशी माझा तिळमात्रही संबंध नाही. लोकशाहीत कोणालाही बोलण्याचे स्वातंत्र्य असल्याने माझ्यावर असे आरोप होत आहेत. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी माझीच मागणी आहे.
संतोष देशमुख हत्येचा खटला फास्ट ट्रॅकवर दरम्यान, संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी न्यायाला विलंब होत असल्याची खंत व्यक्त केली. यावर आ. धस यांनी त्यांना आश्वस्त केले. ते म्हणाले, या प्रकरणी १६ डिसेंबरला मी विधिमंडळात आवाज उठवला होता. मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्याने आरोपींवर ममोक्काफ लागला आहे.
विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम काम पाहत आहेत. ते खासदार झाले असले तरी त्यांनी ही केस सोडलेली नाही. न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागत असला तरी आरोपींच्या विरोधात तीन-तीन कलमे लागल्याने त्यांची सुटका अशक्य आहे.चार्ज फ्रेम करणे कोर्टाच्या हातात असते, पण या आरोपींना फाशीच व्हायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.
धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा
यावेळी आ. धस यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. ज्यांच्या आदे शावरून हा खून झाला, त्यांची बाजू कोण घेत आहे, हे सर्वांना माहीत आहे. जेलमध्ये असणाऱ्यांची कोणाला आठवण येत असेल, तर यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच बोलणे योग्य ठरेल, असा टोला त्यांनी लगावला.
फरार आरोपीचा खटल्यावर परिणाम नाही
या गुन्ह्यातील आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. तो सापडलेला नसला तरी त्याचा मुख्य खटल्याच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही. शासन अत्यंत योग्य पद्धतीने या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असून देशमुख कुटुंबीयांना नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास आ. सुरेश धस यांनी यावेळी व्यक्त केला.