Deer head found in Kej
केज : केज शहरातून जात असलेल्या एका रोडवर मृत हरणाचे मुंडके सापडल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी (दि. ८) दुपारी १२ च्या सुमारास केज येथून बोबडेवाडीकडे जात असलेल्या रोड लगतच्या मस्जिद जवळच्या रोडवरील गतिरोधकाजवळ एक हरिणाचे मुंडके आणि त्याच्या मांसाचे तुकडे आढळून आले. याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली.
त्यानंतर गुप्तवार्ता विभागाचे पोलिस जमादार बाळासाहेब अहंकारे व नागरगोजे यांनी धारूर येथील वनविभागाशी संपर्क साधला आणि या घटनेची माहिती दिली. त्यानंतर वनसेवक वचिष्ठ भालेराव आणि जीवनसिंग गोके यांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ही माहिती पशुधन अधिकारी डॉ. थळकरी यांना दिल्या नंतर त्यांनी शवविच्छेदन केले. या प्रकरणी वनविभागाचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत.
रस्त्यावर ज्या ठिकाणी हरिणाचे मुंडके आणि मांस सापडले त्या ठिकाणी गती रोधक असल्याने कुणी तरी हरिणाची शिकार करून मांस आणि मुंडके दुचाकी वरून घेऊन जात असावे, परंतु रस्त्यावर असलेल्या गतिरोधकावर गाडी आदळल्याने ते खाली पडले असावे आणि कोणी पाहील म्हणून त्यांना चुकविण्यासाठी शिकारी पळून गेला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.