परळी वैजनाथ : बंजारा समाजातील पारंपारिक पद्धतीने होळीचा सण परळी शहर व तालुक्यातील विविध तांड्यांवर अतिशय उत्साहाने साजरा करण्यात येतो. बंजारा बोली भाषेतील लेंगी घेण्याच्या कार्यक्रमाचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमात बंजारा बांधव जल्लोषात, पारंपारिक वेशभूषेत सहभागी होत असतात. परळी तालुक्यात प्रामुख्याने 'लेंगी' च्या पारंपरिक बंजारा गीतांवर थिरकत होळी साजरी होते. तसेच विशेष बाब म्हणजे गेल्या होळीपासुन या होईपर्यंत जन्मास आलेल्या मुलामुलींचे नामकरण (बारसं) करण्याचा 'धुंड' उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने केला जातो.
होळी या सणाला बंजारा समाजात फार महत्व आहे. बंजारा समाज रहात असलेल्या तांडयावर पंधरा दिवस दररोज सायंकाळी लेंगी (गाणे) गायीली जाते. महिला व पुरूषांच्या लेंगीने सर्वच तांडयावर उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झालेले असते. होळीच्या दिवशी बंजारा समाजातील परंपरे नुसार सामुहिक होळी पेटविण्यात येते. होळी पेटल्यावर खरी रंगत येते.बंजारा बोली भाषेतील बंजारा समाजाचे आकर्षण असलेल्या लेंगी (गाणे) चा कार्यक्रम अतिशय रंगतदार ठरतो. लेंगी च्या कार्यक्रमात महिला व पुरुष सहभागी होतात.
बंजारा समाज मागील काही वर्षात शहरात मोठ्या संख्येनी स्थायीक झाला आहे. शहरातील बंजारा समाजात पारंपारिक सणाची गोडी रहावी,बंजारा समाजातील परंपरा,संस्कृती वृद्धिंगत व्हावा यासाठी गेल्या पाच वर्षांपासून परळी येथे बंजारी होळी सणा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.या मध्ये शहरात राहणारे बंजारा समाजबांधव उत्साहात सर्व जण संमिलीत होतात. आनंदात व उत्साहात समाजबांधवांनी गेल्या पाच वर्षांत या उपक्रमात सहभाग नोंदविलेला आहे.- प्रकाश चव्हाण सामाजिक कार्यकर्ते, बंजारा समाज परळी वैजनाथ.
बंजारा संस्कृतीचे संवर्धन व प्रसार करण्यासाठी बंजारा होळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. परंपरांची जपणूक व त्यातून समाजसंघटन यासाठी हा उपक्रम उपयोगी ठरत आहे. बंजारा संस्कृतीचे लोकजीवनाशी असलेले नाते विविध सण, उत्सव यातून दिसून येते. या प्रकारच्या उपक्रमातून स्नेहमिलन तर होतेच परंतु आत्मानंद ही मिळतो.- अरूण पवार प्रसिद्ध कवी व अभ्यासक
दरम्यान, होळी सणानिमित्त दुसर्या दिवशी 'धुंड' उत्सव साजरा केला जातो.गेल्या होळीपासुन या होईपर्यंत जन्मास आलेल्या मुलामुलींचे नामकरण (बारसं) करण्याचा 'धुंड' उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने केला जातो. तसेच त्या मुलाला आशिर्वाद देत त्याच्या उज्वल आयुष्याच्या संपूर्ण समुहाच्या वतीने सदिच्छा दिल्या जातात.