Health Department's initiative for flood victims in Beed district
बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात झालेल्या पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. आता पूर ओसरला तरी त्या भागातील जनतेच्या आरोग्यासाठी जिल्हापरिषद आरोग्य विभागाकडून शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.७ ते ९ ऑक्टोबर या दरम्यान जिल्ह्यात सात ठिकाणी हे शिबीर होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी दिली.
बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पुर आला होता. या पुराच्या पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच अनेक गावच्या जलस्त्रोतांचे पाणी देखील दुषीत होण्याचा धोका यामुळे निर्माण झालेला आहे, त्याबाबतचा आढावा देखील पाणीपुरवठा विभागाच्या मदतीने आरोग्य विभागाकडून घेतला जाणार आहे.
दुषीत पाण्यामुळे गॅस्ट्रो, कॉलरा, काविळ, अतिसार इत्यादी आजारांच्या साथीचा उद्रेक उद्भवू शकतात. तसेच डासांमुळे डेंग्यू, चिकुनगुन्या, मलेरिया, विषाणुतापाच्या साथी देखील उद्भवू शकतात. या पार्शवभूमीवर आरोग्य विभागाकडून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत आता शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि.७ ते ९ या कालावधीत सात ठिकाणी आरोग्य शिबीर होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी दिली.
माजलगाव तालुक्यातील गंगामला आरोग्य केंद्रात दि.७ रोजी, सादोळा येथे दि.८ रोजी व आडगाव येथे दि.९ रोजी शिबीर होणार आहे. यामध्ये डॉ. रुद्रवार, डॉ. वाघमारे, डॉ. सानप, डॉ. घोडके हे रुग्णांची तपासणी करतील. तर गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे दि.७ रोजी, उमापूर येथे दि.८ रोजी डॉ. रांदड, डॉ. संतोष धूत, डॉ. सच्चिदानंद शिंदे हे तपासणी करतील. तर आष्टी तालुक्यातील कडा येथे दि.७ रोजी व शिरुर येथेही दि.७ रोजी डॉ. चारुदत्त पवार, डॉ. सुरेश ढाकणे, डॉ. अभिलाष करपे, डॉ. मनेरी सिद्धार्थ, डॉ. अमोल काळे हे तज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहेत. सर्पदंशाचा धोका वाढला.
पुरपरिस्थिती निर्माण झालेल्या गाव परिसरात साप निघण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सर्पदंशाचा धोकाही वाढला असून त्या दृष्टीने आरोग्य विभागाकडून उपाययोजना केली जात आहे. सर्पदंश झाल्यास करावयाच्या उपचारासाठी आवश्यक औषधे, लस या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना पुरग्रस्त भागात केल्या जात आहेत. पुरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका लक्षात घेवून त्या भागातील गर्भवती महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची उपाययोजना करण्यात आली होती. त्यानंतर आता पुर ओसरताच ज्या साथरोगांचा धोका निर्माण होऊ शकतो, त्यावरही उपाययोजना केली जात आहे.-डॉ. उल्हास गंडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड