Vijaykumar Rakh Death : ‘हास्य जत्रे’च्या टीममधील लेखक विजयकुमार राख यांचे अपघाती निधन Pudhari
बीड

Vijaykumar Rakh Death : ‘हास्य जत्रे’च्या टीममधील लेखक विजयकुमार राख यांचे अपघाती निधन

बीडजवळ भरधाव कारची दुचाकीला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

बीड : सोनी मराठीवरील प्रसिद्ध ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ कार्यक्रमासाठी लेखन करणारे लेखक विजयकुमार राख (३१) यांचे अपघाती निधन झाले. बीडजवळ चराटा फाटा येथे बुधवारी रात्री भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राख यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

ही घटना बुधवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. विजयकुमार राख हे गेल्या पाच-सहा वर्षांपासून मुंबईत कार्यरत होते. सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या लेखन टीममध्ये ते कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी ते बीडला परतले होते. बीड येथील नवगण विद्यालयात नाट्यशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणूनही ते कार्यरत होते.

बुधवारी रात्री चराटा फाटा परिसरातून दुचाकीवरून घरी जात असताना भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर परिसरातील तरुणांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. विजयकुमार राख यांच्या पश्चात पत्नी, तीन वर्षांची मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बीड तालुक्यातील वंजारवाडी या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

सचिन गोस्वामी यांनी केली भावुक पोस्ट

विजयकुमार राख यांच्या निधनानंतर ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’चे लेखक सचिन गोस्वामी यांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली.

‘हास्य जत्रा’च्या सृजन टीममधील लेखक विजयकुमार राख यांचे रात्री एका अपघातात निधन झाले. विजयकुमार यांना विनोदाची उत्तम जाण होती. ग्रामीण जीवनातील बारकावे हेरणारा मराठवाड्यातील एक होतकरू लेखक म्हणून त्यांची ओळख होती. ऐन तारुण्यात त्यांचे जाणे हे कलाक्षेत्रासह ‘हास्य जत्रा’ टीम आणि मित्रपरिवारासाठी मोठा धक्का आहे. ‘हास्य जत्रा’ टीम त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे,’ अशा आशयाची पोस्ट गोस्वामी यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT