Beed illegal liquor pudhari photo
बीड

Beed illegal liquor : हरिश्चंद्र पिंपरीत अवैध दारूविरोधात ग्रामस्थ आक्रमक

ग्रामपंचायतीचे पोलिसांना निवेदन; कारवाई न झाल्यास वडवणीत रास्ता रोकोचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

वडवणी : हरिश्चंद्र पिंपरी ग्रामपंचायत हद्दीत सुरू असल्याचा आरोप असलेली अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीच्या वतीने वडवणी पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले. अवैध दारू विक्रीमुळे गावातील शांतता व सुव्यवस्थेवर परिणाम होत असून महिला, युवक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

गावातील तांड्यात दोन ठिकाणी अवैध दारू विक्री होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. यापूर्वी संबंधितांना सूचना करून तसेच शासकीय यंत्रणांचे लक्ष वेधूनही विक्री सुरूच असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. दारू विक्री व सेवनामुळे सार्वजनिक शांततेचा प्रश्न निर्माण होत असून, चोरीचे प्रकारही वाढल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, दारू विक्रीचे कथित ठिकाण जिल्हा परिषद शाळा आणि देशातील एकमेव राजा हरिश्चंद्र मंदिरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. त्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.अवैध दारू विक्रीची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि विक्री कायमस्वरूपी बंद करावी, अशी मागणी करण्यात आली.

कारवाई न झाल्यास वडवणी येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी दिला आहे.हे निवेदन सरपंच दिनकर शिंदे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांना दिले.

यावेळी ह.भ.प. भगवान महाराज राजपूत उपस्थित होते. निवेदनावर भागवत अच्युतराव शिंदे, भीमराव बापुराव काकडे, शंकर जगन्नाथ जाधव, धनंजय अर्जुन जाधव, भागवत वसंत जाधव, सत्यप्रेम आबासाहेब राठोड, संदिपान श्रीराम राठोड, विलास अण्णा राठोड, बालासाहेब नवनाथ शिंदे यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT