Half of the rainy season has passed; but the wells and borewells remain dry
धारूर, पुढारी वृत्तसेवा : 'ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा...' अशी आर्त हाक देण्याची वेळ धारूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटले तरी तालुक्यात अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. अधूनमधून झालेल्या हलक्या सरींवर पिकांनी तग धरला असला, तरी जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असल्याने आगामी काळात पावसाने हजेरी न लावल्यास खरीप पिकांसमोर संकट उमे राहण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील शेतशिवारात सोयाबीन, कापूस यासह विविध खरीप पिकांची वाढ सध्या समाधानकारक दिसत आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनला फुले लागली असून काही शेतांमध्ये शेंगाही धरू लागल्या आहेत. कापूस पिकाचीही वाढ चांगली होत आहे. मात्र पिकांची वाढीची अवस्था महत्त्वाची असताना जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही तर पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
अल्प पावसाचा परिणाम तालुक्यातील जलसाठ्यांवरही झाला आहे. अनेक गावांमधील विहिरी आणि बोअरवेलमध्ये अद्याप अपेक्षित पाणी आलेले नाही. तांदळवाडी तलावासह तालुक्यातील लहान-मोठ्या तलावांमध्येही पाणीसाठा समाधानकारक झालेला नाही. त्यामुळे पावसाने आणखी ओढ दिल्यास शेतीबरोबरच आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. पिकांवर केलेला खर्च वाढत असताना पाणी उपलब्ध नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पिके डोलू लागली आहेत; मात्र त्यांची 'पाण्याची भूक' भागविण्यासाठी आभाळाकडे पाहण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय उरलेला नाही.
'पिके जोमात, तर पाऊस कोमात'
खरीप पिके सध्या जोमात असली तरी त्यांना आता दमदार पावसाची गरज आहे. आगामी काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्यास पिकांना मोठा दिलासा मिळेल. मात्र पावसाने आणखी दडी मारल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धारूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागले असून, 'ये रे ये रे पावसा...' अशी आर्त हाक शेतशिवारातून ऐकू येत आहे.