महागाईचा फटका आता साखरगाठींनाही pudhari photo
बीड

Sugar garlands cost increase : महागाईचा फटका आता साखरगाठींनाही

कच्चामाल व मजुरीही वाढली; गुढीपाडव्याला असतो विशेष मान

पुढारी वृत्तसेवा

शिवनाथ जाधव

टाकरवण : होळीचा सण पार पडताच बाजारात गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर साखरगाठींना मोठी मागणी वाढू लागली आहे. मात्र वाढत्या महागाईचा फटका आता या पारंपरिक गोड पदार्थालाही बसला असून यंदा साखरगाठींच्या किमतीत वाढ झाली आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी उभारल्या जाणाऱ्या गुढीला साखरगाठी अर्पण करण्याची परंपरा आहे. होळीच्या दिवशी लहान बालकाचे औक्षण करून पांढरे वस्त्र देत गाठींचा हार घालण्याची पद्धत आहे. तसेच लग्न ठरलेल्या उपवधू व नववधूला गाठी आणि चोळी देऊन ओटी भरण्याची प्रथा ग्रामीण भागात आजही जपली जाते. त्यामुळे होळीच्या दहा दिवस आधीपासून गाठी बनवण्याच्या उद्य ोगाला वेग येतो.

पूर्वी शिवरात्रीपासून गुढीपाडव्यापर्यंत जवळपास महिनाभर हा व्यवसाय चालायचा; मात्र कालानुरूप बदलामुळे आता उत्पादनाचा कालावधी कमी झाला आहे. सध्या होळी अवघ्या काही दिवसांवर आल्याने गाठी तयार करण्याच्या कामाला गती मिळाली आहे.

यंदा साखरगाठींचा किरकोळ दर प्रतिकिलो १२० रुपये तर घाऊक दर ८० रुपये इतका आहे. साखरेच्या दरात मोठी वाढ नसली तरी इंधन, पाणी, दोरा, दूध यांसारख्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यातच मजुरांची टंचाई जाणवत असून अधिक मजुरी देऊनही कामगार सहज उपलब्ध होत नसल्याने उत्पादन खर्च वाढला आहे.

परिणामी साखरगाठींच्या किमती वाढवण्याची वेळ कारागिरांवर आली आहे. गुढीपाडव्याच्या उत्साहात साखरगाठींची गोडी कायम असली, तरी महागाईच्या कडवट चवीचा अनुभव यंदा ग्राहक आणि कारागीर दोघांनाही घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.

उद्योग टिकवण्यासाठी झटतोय : अशोक वीर

२० ग्रॅमपासून ४०० ग्रॅमपर्यंत एक गाठ तयार केली जाते. दररोज साधारण ७० ते ८० किलो माल तयार होतो. गाठी बनवण्यासाठी लागणारे मनुष्यबळ अधिक मजुरी देऊनही उपलब्ध होत नाही. त्यामुळे अडचणी निर्माण होतात; मात्र गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून आमचे कुटुंब हा पारंपरिक व्यवसाय टिकवून ठेवत आहे, अशी माहिती साखरगाठी तयार करणारे कारागीर अशोक वीर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT