आष्टी: तालुक्यातील आरणविहरा येथे एका ग्रामरोजगार सेवकाने लोकनियुक्त महिला सरपंचाला सार्वजनिक ठिकाणी अश्लील भाषेत शिवीगाळ करत त्यांच्या चारित्र्यावर गंभीर आरोप केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित ग्रामरोजगार सेवकाच्या निलंबनाची मागणी जोर धरू लागली आहे. याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरणविहरा गावाच्या सरपंच यांचे पती अण्णा शिरसाठ हे १३ ऑगस्ट रोजी गावातील काही नागरिकांसोबत विकासकामांवर चर्चा करत होते. यावेळी गावातील ग्रामरोजगार सेवक राजू रघुनाथ रामगुडे याने चर्चेत हस्तक्षेप करत महिला सरपंचावर बिनबुडाचे आरोप करण्यास सुरुवात केली. बोलता-बोलता रामगुडे याचा तोल सुटला आणि त्याने सरपंचांना उद्देशून अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. यावेळी दुसऱ्या एका व्यक्तीनेही ‘सरपंच नालायक आहे, आम्ही बोलणारच,’ असे म्हणत उद्धट वर्तन केले.
महिला सरपंच गावात उपस्थित नसताना त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याच्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. एका लोकप्रतिनिधी महिलेसोबत सार्वजनिक ठिकाणी असे असभ्य वर्तन करणे चुकीचे असून, या मुजोर कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेमुळे गावातील वातावरण ढवळून निघाले आहे.
याप्रकरणी सरपंच पती अण्णा शिरसाठ यांनी अंभोरा पोलिसांत तक्रार दिली आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "येत्या दोन दिवसांत ग्रामरोजगार सेवक राजू रामगुडे याला निलंबित केले नाही, तर आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांसह तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसू," असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे आता प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एका शासकीय कर्मचाऱ्याने लोकशाही मार्गाने निवडलेल्या महिला लोकप्रतिनिधीचा केलेला अपमान सहन केला जाणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.