गौतम बचुटे : केज
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्यात यावी. तसेच फरार संशयित आरोपी आणि मास्टर माईंड वाल्मीक कराड यांना तात्काळ अटक करण्यात यावी. या मागणीसाठी आज (शनिवार) बीड येथे होणाऱ्या मोर्चासाठी संतोष देशमुख यांच्या मस्साजोग या गावातील सर्व गावकरी सहभागी झाले आहेत. अख्खे गाव आपले सर्व व्यवहार बंद करून अक्षरशः घराला कड्या-कुलूप लावून मोर्चात सहभागी झाले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला आज १९ दिवस पूर्ण झाले आहेत. तरीही यातील संशयित मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तिघे फरार आहेत. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड हे संतोष देशमुख हत्याकांडातील मास्टर माईंड असल्याची चर्चा असून या प्रकरणाशी संबंधित असलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या खंडणी प्रकरणात त्यांचे नाव आलेले आहे.
दरम्यान संतोष देशमुख हत्याकांडातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशी देण्यात यावी. तसेच या गुन्ह्यात वाल्मीक कराड यांचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात यावा यासाठी आज दिनांक २८ डिसेंबर रोजी बीड येथे सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मस्साजोग येथील सर्व नागरिक सहभागी झालेले आहेत.