गेवराई : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रतीक्षेत असलेल्या गेवराई तालुक्यातील इच्छुक उमेदवारांना पुन्हा एकदा प्रतीक्षेचा धक्का बसला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आगामी काळात प्रथम महानगरपालिका निवडणुका घेण्यात येतील, त्यानंतरच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा विचार केला जाईल, असे स्पष्ट संकेत दिले.
आयोगाकडून महानगरपालिका निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम जाहीर झाल्याने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी काही काळ लांबणीवर जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
या घोषणेचा थेट परिणाम गेवराई तालुक्यातील राजकीय वातावरणावर उमटताना दिसत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून मैदानात उतरलेले अनेक इच्छुक उमेदवार निराश झाले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून संभाव्य उमेदवारांनी आपापल्या सर्कल व गणांमध्ये जोरदार जनसंपर्क सुरू केला होता. गावोगावी बैठका, कार्यकर्त्यांच्या भेटी, सामाजिक कार्यक्रमांमधील उपस्थिती, मतदारांशी थेट संवाद यावर भर दिला जात होता. मात्र निवडणूक कार्यक्रम लांबणीवर गेल्याने या हालचालींना काहीसा ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
गेवराई तालुक्यात एकूण 9 सर्कल व 18 गण असून, प्रत्येक ठिकाणी इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे. काही सर्कलमध्ये तर उमेदवारीसाठी स्पर्धा चांगलीच रंगली होती. संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत होती; पक्षांतर्गत हालचालींना वेग आला होता, तर काही इच्छुकांनी अपक्ष लढतीचीही चाचपणी सुरू केली होती. मात्र आता सर्वांच्याच मनात एकच प्रश्न घोळत आहे - निवडणूक नेमकी कधी?
राजकीय जाणकारांच्या मते, महानगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतरच राज्य निवडणूक आयोग ग्रामीण भागातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी अजून काही महिने प्रतीक्षा करावी लागू शकते. या काळात इच्छुक उमेदवारांना संयम राखत संघटन मजबूत करणे, जनसंपर्क टिकवून ठेवणे आणि स्थानिक प्रश्नांवर सक्रिय राहणे, हाच मार्ग उरला आहे
दरम्यान, निवडणुका लांबणीवर गेल्याने स्थानिक विकासकामे, प्रशासकीय निर्णय व जनतेच्या प्रश्नांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून निवडणूक कार्यक्रम लवकर जाहीर करावा, अशी मागणी हळूहळू जोर धरू लागली आहे.