गेवराई : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून पांचाळेश्वर (ता. गेवराई) येथील अनंतराज रतन शेवलीकर यांची ५ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरुद्ध चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीतून मिळालेल्या पैशातून नागपूर येथील दीनदयाळ नगर परिसरात फ्लॅट खरेदी केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०२५ ते २६ एप्रिल २०२५ या कालावधीत अमोघ संदीपराज कपाटे (रा. श्री दत्त प्रभु सेवाश्रम, हनुमानवाडी, चौधरी वस्ती, भोकर, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास दरमहा चांगला व आकर्षक परतावा मिळेल, असे आमिष त्याने दाखविल्याचा आरोप आहे.
या आश्वासनावर विश्वास ठेवून शेवलीकर यांनी भारतीय स्टेट बँकेच्या राक्षसभुवन शाखेतून वेळोवेळी एकूण ५ लाख ४० हजार रुपये आरोपीच्या बँक खात्यावर वर्ग केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मात्र, आरोपीने ही रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक न करता डिजिटल कागदपत्रांवर रक्कम वाढत असल्याचे भासवून आपली दिशाभूल केल्याचा आरोप शेवलीकर यांनी केला आहे.
तसेच, संबंधित रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून आरोपीने नागपूरमधील दीनदयाळ नगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट खरेदी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अनंतराज रतन शेवलीकर यांच्या फिर्यादीवरून अमोघ संदीपराज कपाटे याच्याविरुद्ध चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संदीप इंगळे करीत आहेत.