Gevrai market pudhari photo
बीड

Beed Gaurai Festival : गेवराईत गौराईच्या स्वागताची तयारी; सायंकाळी आवाहनाचा मुहूर्त

गेवराईत सजावटीच्या साहित्याला मोठी मागणी : घरोघरी फराळाचा सुगंध

पुढारी वृत्तसेवा

गजानन चौकटे

गेवराई: गणपती बाप्पाच्या आगमनानंतर आता घराघरांत लाडक्या गौराईच्या आगमनाचे वेध लागले आहेत. सोनपावलांनी येणाऱ्या गौराईच्या स्वागतासाठी गेवराई शहरात मोठी लगबग सुरू असून, आवाहनाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत महिलांची खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. फुले, हार, तोरण, सजावटीचे साहित्य, गौरीचे अलंकार आणि पूजेच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. दुसरीकडे घराघरांत फराळाची तयारी सुरू झाल्याने संपूर्ण वातावरणात सणासुदीचा सुगंध दरवळत आहे.

गौरीच्या स्वागतासाठी घराची स्वच्छता, सजावट, आसन व्यवस्था आणि वस्त्रालंकारांची जुळवाजुळव पूर्ण करण्यासाठी गृहिणींची धावपळ सुरू आहे. अनेक घरांत करंज्या, लाडू, चकली, शंकरपाळे यांसारखे फराळाचे पदार्थ तयार केले जात आहेत. बाजारपेठेत झेंडूच्या फुलांसह आकर्षक तोरणे, पारंपरिक दागिने आणि पूजेच्या साहित्याला विशेष मागणी आहे.

गुरुवार, १७ सप्टेंबर (गौरी आवाहन) : सायंकाळी ४:५६ ते ७:५४ या वेळेत गौराईचे स्वागत व आवाहन केले जाईल.शुक्रवार, १८ सप्टेंबर (गौरी पूजन) : ज्येष्ठ गौरी पूजनाचा मुख्य दिवस असून, या दिवशी गौराईला विविध पदार्थांचा महानैवेद्य दाखवला जाईल व हळदी-कुंकवाचे आयोजन केले जाईल.शनिवार, १९ सप्टेंबर (गौरी विसर्जन) : मूळ नक्षत्रात सायंकाळी ७:५४ वाजेपर्यंत गौरी विसर्जनाची वेळ आहे. गणपती बाप्पाच्या जयघोषाने भारावलेले गेवराई शहर आता गौराईच्या स्वागतासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. ‘गौराईने सुख-समृद्धी घेऊन यावे’ या भावनेने सर्वत्र भक्तिमय व आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे.

"ज्येष्ठ गौरीचे आवाहन आणि पूजन ही महाराष्ट्राची समृद्ध धार्मिक परंपरा आहे. आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार श्रद्धेने गौरीचे आवाहन करून पूजन करावे. यंदा गुरुवारी सायंकाळी ४.५६ ते ७.५४ या कालावधीत गौरी आवाहन करता येईल. शुक्रवारी पूजन व महानैवेद्य करून शनिवारी मूळ नक्षत्रात सायंकाळी ७.५४ पर्यंत विसर्जन करता येईल."
वेदशास्त्रसंपन्न नागेश चौथाईवाले (राक्षसभुवन)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT