गेवराईत 'अवकाळी'चा तडाखा; डोळ्यादेखत पिके उद्धवस्त झाल्याने शेतकरी हवालदिल 
बीड

Georai rain : गेवराईत 'अवकाळी'चा तडाखा; डोळ्यादेखत पिके उद्धवस्त झाल्याने शेतकरी हवालदिल

प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

गेवराई : दिवसभर अंगाची लाही करणारा प्रचंड उकाडा… शेतात उभ्या पिकांकडे आशेने पाहणारा शेतकरी.. “आता काही दिवसांत काढणी होईल” या आनंदात दिवस काढत असतानाच सायंकाळी निसर्गाने अचानक रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या पाऊण तासाच्या अवकाळी पावसाने सगळं काही उद्ध्वस्त करून टाकलं.

मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि गारांचा मारा… या सगळ्यांनी मिळून गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत त्यांची वर्षभराची मेहनत अक्षरशः मातीमोल केली. ज्वारीची कणसं भरलेली पिकं जमिनीवर लोळली… गव्हाचे पीक पूर्णपणे आडवं पडलं… काढणीला आलेली बाजरी क्षणार्धात वाया गेली. सर्वात मोठा घाव बसला तो जनावरांच्या चाऱ्यावर… जनावरांसाठी आशेचा आधार असलेला मका पूर्णपणे जमीनदोस्त झाला. शेतात उभा असलेला हिरवा चारा आता चिखलात मिसळलेला दिसतोय… “आता जनावरांना खाऊ काय घालायचं?” या प्रश्नाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहत आहेत.

दरम्यान, गेवराई बाजारपेठेतही या पावसाने गोंधळ उडवला. अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांची अक्षरशः ताराबंळ उडाली. कुणी माल वाचवण्याच्या प्रयत्नात भिजत होता, तर कुणी आसरा शोधत होता. काही ठिकाणी माल पूर्णपणे भिजून नुकसान झाल्याने व्यापाऱ्यांच्याही डोळ्यात चिंता स्पष्ट दिसत होती. हा पाऊस फक्त पिकांचंच नाही, तर शेतकऱ्यांच्या आशांचंही नुकसान करून गेला आहे. एका बाजूला हातात आलेलं पीक गेलं, तर दुसऱ्या बाजूला जनावरांसाठी चारा नाही… अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकला आहे. आता सर्वांच्या नजरा प्रशासनाकडे लागल्या आहेत. नुकसानग्रस्त भागांचा तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना त्वरीत मदत मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे. पण “पंचनामा कधी होणार?” हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.

'आम्ही वर्षभर कष्ट करून पीक उभं केलं'. मात्र, या अवकाळी पावसामुळे सगळं पीक मातीमोल झालं.
धनंजय ऊबाळे, शेतकरी, भेंडटाकळी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT