Gevarai Nagarparishad | गेवराई नगराध्यक्षांविरोधातील अपात्रता अर्ज फेटाळला; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय  
बीड

Gevarai Nagarparishad | गेवराई नगराध्यक्षांविरोधातील अपात्रता अर्ज फेटाळला; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

१९६५ मधील तरतुदी, उपलब्ध कागदपत्रे, लेखी म्हणणे, न्यायालयीन नोंदींचा विचार करून निर्णय

पुढारी वृत्तसेवा

गेवराई : गेवराई नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष श्रीमती गीता त्र्यंबक उर्फ बाळारजे पवार यांच्याविरोधात अर्जदार संजय काळे यांनी दाखल केलेला अपात्रतेचा अर्ज बीड जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावत महत्त्वपूर्ण आदेश पारित केला आहे. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील तरतुदी, उपलब्ध कागदपत्रे, लेखी म्हणणे, न्यायालयीन नोंदी तसेच संबंधित कायद्याचा सखोल विचार करून हा निर्णय देण्यात आला.

सुनावणीदरम्यान नगराध्यक्षांच्या वतीने ॲड. राधेशाम बी. जाजू यांनी प्रभावी व मुद्देसूद युक्तिवाद करत अर्जातील आरोप वस्तुस्थिती, कायदा व उपलब्ध पुराव्यांच्या कसोटीवर टिकत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा आधार घेत संबंधित कायद्याच्या तरतुदींचे सविस्तर विश्लेषण केले. तसेच अर्जदार संजय काळे यांनी केलेले सर्व आरोप पुराव्याअभावी सिद्ध करण्यात अपयशी ठरले असून, जिल्हाधिकारी न्यायालयासमोर त्यास कोणताही ठोस कायदेशीर अथवा वस्तुनिष्ठ आधार दाखविता आला नाही, असे ठामपणे मांडले.

अर्जदाराने नगराध्यक्षांविरोधात विविध आरोप करत अपात्रतेची मागणी केली होती. मात्र सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांचा, दोन्ही बाजूंच्या युक्तिवादाचा तसेच संबंधित कायदेशीर तरतुदींचा सखोल विचार करण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या सविस्तर आदेशात उपलब्ध नोंदी, लेखी म्हणणे, कायदेशीर तरतुदी तसेच न्यायालयीन निर्णयांचा आधार घेत अर्जदाराचे म्हणणे ग्राह्य धरता येत नसल्याचे नमूद केले. सदर प्रकरणात करण्यात आलेले आरोप सक्षम पुराव्यांच्या आधारे सिद्ध करण्यात अर्जदार अपयशी ठरल्याचे तसेच नगराध्यक्षांविरुद्ध अपात्रतेची कार्यवाही करण्यासाठी आवश्यक असा कायदेशीर आधार उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करत अपात्रतेचा अर्ज नामंजूर करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT