गेवराई : शहरातील गेवराई-बीड राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेली काही अतिक्रमणे सोमवारी (दि.२४) काढण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशावरून गेवराई नगर परिषदेच्या पथकाने ही कारवाई केली. अचानक झालेल्या कारवाईमुळे लहान-मोठ्या व्यवसायिकांची ताराबंळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून गेवराई शहरामधील राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूच्या रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे. या ठिकाणी लहान-मोठ्या व्यावसायिकांची दुकाने असल्याने रहदारीस अडथळा निर्माण झालेला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमणधारकांना तीन महिन्यापूर्वीच नोटीस देऊन अतिक्रमण काढण्याबाबत सूचना दिली होती. मात्र, अतिक्रमण धारकांनी त्या नोटीसला जुमानले नाही. अखेर या अतिक्रमणावर आज (सोमवारी) प्रशासनाचा हातोडा पडला. नगर परिषदेच्या अतिक्रमण पथकाने सकाळपासून महामार्गावरील अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली. यामुळे वेळेत व्यवसायिकांना आपले साहित्य दुकानातून हलवता न आल्याने व्यवसायिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार बीड-जालना महामार्गावरील अतिक्रमण काढण्यास सुरूवात झाली आहे. नागरिकांनी नगरपरिषदला अतिक्रमण काढून सहकार्य करावे. जे अतिक्रमण काढण्यास सहकार्य करणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.विक्रम मांडुरके, मुख्याधिकारी नगरपरिषद गेवराई