गजानन चौकटे
गेवराई ः एका छोट्याशा हॉटेलवर उभं असलेलं संपूर्ण कुटुंब आणि त्या कुटुंबाच्या स्वप्नांना आज धुराने वेढून टाकलं आहे. गेवराई तालुक्यातील विक्रम गिरी यांची ही कहाणी मनाला चटका लावणारी आहे. हे हॉटेलच आमचं सगळं काही आहे आमची उपजीविका, आमचं जगणं, असे बोलताना विक्रम गिरी यांचा आवाज क्षणभर थरथरतो.
गेवराई शहरात विक्रम गिरी यांचे हॉटेल आहे. पूर्वी गॅसवर सुरळीत चालणारा व्यवसाय आता गॅस टंचाईमुळे अडचणीत सापडला आहे. नाईलाजाने त्यांनी पुन्हा कोळशाच्या भट्टीकडे वळावं लागलं. पण ही भट्टी फक्त अन्न शिजवत नाही ती त्यांच्या आयुष्याचा संघर्षही जाळते आहे.
कोळसा मिळणं खूप अवघड झालंय आणि मिळालाच तर इतका महाग की परवडत नाही, पण काय करणार? हॉटेल बंद ठेवायचं म्हणजे घरचं चूलही विझेल, असं सांगताना त्यांच्या डोळ्यांत काळजी स्पष्ट दिसते. भट्टीतून निघणारा दाट धूर केवळ वातावरणच नाही तर त्यांच्या आरोग्यावरही परिणाम करतो आहे.
त्या धुरात उभं राहून ते रोज आपल्या कुटुंबासाठी दोन वेळच्या भाकरीची लढाई लढत आहेत.ग्राहकही धुरामुळे त्रस्त होतात, काहीजण परत जातात पण विक्रम गिरी मात्र आशा सोडत नाहीत. परिस्थिती कधी तरी बदलेल पुन्हा गॅस मिळेल आणि आमचं हॉटेल पुन्हा पूर्वीसारखं सुरू होईल, अशी आशा त्यांच्या मनात अजूनही जिवंत आहे.दरम्यान, या परिस्थितीचा परिणाम त्यांच्या दैनंदिन उत्पन्नावरही होत असून, घरखर्च भागवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.
मुलांच्या शिक्षणापासून घरातील किराणा खर्चापर्यंत प्रत्येक गोष्ट सांभाळताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.धूर फक्त भट्टीतूनच नाही, तर आयुष्यावरही पसरलाय पण तरीही चूल पेटती ठेवायची आहे, या एका वाक्यात विक्रम गिरी यांचा संघर्ष आणि जिद्द दोन्ही दिसून येतात.