अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारले जाणार आहे. Pudhari News Network
बीड

Ganesh Chaturthi : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे गणेशोत्सवाचे गिफ्ट

1 हजार 150 खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारणार; ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे रूपांतर आदर्श शासकीय संस्थेमध्ये करावे

पुढारी वृत्तसेवा

बीड : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी यासाठी अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारले जाणार आहे. तसेच देशातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने करावे, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देत बीड जिल्हा वासियांना गणेशोत्सवाचे गिफ्टच दिले आहे.

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाबाबत मंत्रालयात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, संचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे, वित्त विभागाच्या सचिव (वित्तीय सुधारणा) शैला ए. तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, अंबाजोगाई महाविद्यालयाचे रूपांतर आदर्श शासकीय संस्थेमध्ये करायचे आहे. यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. आधी सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांचा समावेश करून नवीन मास्टर प्लॅन तयार करावा. नवीन रुग्णालयात आधुनिक सुविधा, सुपर स्पेशालिटी सेवा असाव्यात. काम नियोजनबद्ध व जलद गतीने पूर्ण व्हावे. जिल्हा वासियांसाठी हि अनोखी भेट ... त्यांनी पुढे सांगितले की, रुग्णांची संख्या लक्षात घेता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्तावही तातडीने सादर करावा. सध्या अस्तित्वातील इमारतींचा योग्य वापर करून नियोजन करावे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, अंबाजोगाईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा उंचावण्यासाठी कार्यवाही ठोस आणि वेगवान व्हावी. चांगला आराखडा तयार करून दर्जेदार काम केले पाहिजे.

मराठवाड्याला दिलासा

या निर्णयामुळे मराठवाडा विभागातील लोकसंख्येला मोठा दिलासा मिळणार असून, स्थानिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी संधी उपलब्ध होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना तज्ज्ञ आरोग्यसेवा मिळून आरोग्य व्यवस्थेत मोठी क्रांती घडणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT