अंबाजोगाई : अंबासाखर कारखाना रोड वरील न्यू दरबार हॉटेल येथे मंगळवारी (दि.२६) रात्री साडेआठच्या सुमारास अविनाश शंकर देवकर , सलमान मुस्तस्फा आणि स्वराज पोळ हे तिघे जेवण्यासाठी आले होते. त्यावेळी आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणातून स्वराज पोळ याने अविनाशच्या डोक्यात तसेच मानेवर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले आणि पसार झाला. गंभीररीत्या जखमी झालेल्या अविनाशचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अविनाशचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रूग्णालयात पाठविण्यात आला.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य व गणेशोत्सवाचे दिवस असल्याने अंबाजोगाई शहर पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या सहा तासातच पळून जात असलेल्या खुनी स्वराज पोळ यास सापळा रचून अत्यंत शिताफीने सोलापूर तुळजापुर महामार्गावर जेरबंद करण्यास यश मिळवले. मयत अविनाशची आई अंजना यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
बुधवारी (दि. २७) रोजी अविनाश देवकर याच्या मृतदेहाचे अंबाजोगाई येथील रूग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास एपीआय राजेंद्र घुगे हे करत आहेत. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घुगे , पीएसआय पवार, पीएसआय शिंदे, पोलीस हवालदार भागवत नागरगोजे, पोहेका गायकवाड, गुट्टे व इतर पोलिसांनी आरोपीचा माग काढत पर जिल्ह्यामध्ये पळून गेलेल्या स्वराज पौळ यास नाट्यमयरीत्या सहा तासातच अटक केली.