Fraud of Rs 25 lakhs with the lure of cheap flight tickets
बीड, पुढारी वृत्तसेवा: स्वस्तात विमानाची तिकिटे मिळवून देतो अशी बतावणी करून तब्बल २५ लाखांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला बीड शहर डीबी पथकाने लोणावळा (जि. पुणे ग्रामीण) येथून अटक केली आहे. बराच काळ फरार असलेल्या या आरोपीच्या अटकीनंतर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
तक्रारदार अण्णासाहेब गोटीराम राठोड यांचा मुलगा विदेशात शिक्षणासाठी राहत असल्याने त्याच्या येण्या-जाण्यासाठी तिकिटांची आवश्यकता होती. याचीच संधी साधत कुणाल भाऊसाहेब चव्हाण (वय २९, रा. चासनळी, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) याने तिकिटे स्वस्तात मिळवून देतो असे सांगून तक्रारदाराकडून २५ लाख उकळले.
परंतु दीर्घकाळ तिकीट न देताच आरोपी गायब झाला. त्यामुळे बीड शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार असून तांत्रिक तपास, सीडीआर, लोकेशन अॅनालिसिस आणि गुप्त माहितीच्या आधारे बीड डीबी पथकाने शोधमोहीम राबवली. त्यानंतर आर-विमान ोपी लोणावळा परिसरात लपून बसल्याची माहिती मिळताच पथकाने धाड टाकून त्याला ताब्यात घेत अटक केली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा पवार यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. कारवाईत पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश जाधव, गहिनाथ बाबनकर, राम पवार यांनी प्रमुख भूमिका बजावली. दरम्यान, स्वस्तात विमानाची तिकिटे, परदेशात नोकरी, मोठा माल स्वस्तात अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, मोठ्या आर्थिक व्यवहारापूर्वी पूर्ण तपासणी करा, संशयास्पद वाटल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले आहे.
खरे कारण वेगळेच ?
अण्णासाहेब राठोड यांचा मुलगा विदेशात असून त्याला जाण्या येण्यासाठी विमानाची तिकीटे स्वस्तात मिळवून देतो म्हणत २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात आरोपीला अटक केले आहे. परंतु अशा पद्धतीने विमानाच्या तिकिटासाठी कोणी २५ लाख रुपये देऊ शकतो का? किमान पाच वर्ष शिक्षणाचा कालावधी असेल तर किती वेळेस हा विद्यार्थी भारतात येऊन परत जाणार होता? आणि त्यासाठी एकाच वेळी एवढी मोठी रक्कम कोणी देऊ शकेल का? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून या फसवणूक प्रकरणामागे खरे कारण काही वेगळेच असावे असा संशय व्यक्त केला जात आहे.