केज: वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित पालकांना लुटणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. स्वतःला 'मोठा माणूस' भासवणाऱ्या सौरभ कुलकर्णी या महाठगाने आपल्या साथीदारासह सोलापूर जिल्ह्यातील एका डॉक्टरला तब्बल ५ लाख रुपयांना गंडवल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या महाठगाने महाराष्ट्रसह गुजरात आणि पंजाब राज्यातही आपले जाळे पसरवले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब (ता. माढा) येथील डॉ. मारुती ज्ञानदेव सुर्वे यांना आपल्या मुलाला, स्वप्नील सुर्वे याला बी.ए.एम.एस. (BAMS) करायचे होते. २०१७ मध्ये एका वृत्तपत्रात आलेल्या एका जाहिरातीवर विश्वास ठेवून त्यांनी संपर्क साधला असता, त्यांची भेट सौरभ कुलकर्णी आणि औषध विक्री प्रतिनिधी विश्वास शाईवाले यांच्याशी झाली. कर्नाटक राज्यातील विजापूर येथील कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करून देण्याचे आश्वासन दिले. प्रवेशासाठी एकूण ५ लाख २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. डॉ. सुर्वे यांनी ५० हजार रोख आणि उरलेली रक्कम बँक खात्याद्वारे कुलकर्णीच्या वडिलांच्या खात्यावर वर्ग केली. मुलाचा प्रवेश तर झाला, पण प्रत्यक्षात कॉलेजमध्ये केवळ २५ हजार रुपयेच भरण्यात आले होते. उर्वरित ५ लाख रुपये आरोपींनी संगनमत करून हडपले.
बीड जिल्ह्यातील डॉ. तोंडे यांची ८ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी केज पोलिसांनी (स.पो.अ. व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली) सौरभ कुलकर्णीला कराड येथून अटक केली. त्याच्या चौकशीत सोलापूर, नागपूर, जालना, सांगली, पुणे आणि मुंबईतील अनेक फसवणुकीची प्रकरणे उघडकीस येत आहेत. प्रवेशावेळी स्वतः महाठक हजर होता. विशेष म्हणजे, विजापूर येथील कॉलेजमध्ये मुलाचे ॲडमिशन घेताना सौरभ कुलकर्णी स्वतः उपस्थित होता, जेणेकरून पालकांचा विश्वास संपादन करता येईल.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. सुर्वे यांनी पाठपुरावा केला, मात्र पैसे परत मिळाले नाहीत. अखेर याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात (गु.र.नं. ६१७/२०१८) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पालकांनी कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीला किंवा एजंटला प्रवेशासाठी पैसे देऊ नयेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.