केज : केज विधानसभेच्या माजी आमदार प्रा. संगीता ठोंबरे यांच्या गाडीवर दहिफळ वडगाव येथे बुधवारी (दि.२८) सायंकाळी विजय उत्तमराव गदळे आणि त्याच्या साथीदारांनी दगडफेक करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यात गाडीचा चालक किशोर बबन मोरे आणि ठोंबरे जखमी झाल्या. या घटनेला बारा तास उलटूनही अद्याप हल्लेखोरांना अटक करण्यात आलेली नाही.
बुधवारी दुपारी वडनाऊली दहिफळ येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सव कार्यक्रमानिमित्त संगिताताई ठोंबरे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर त्या परत निघत असताना काही कार्यकर्त्यांनी त्यांना चहा पिण्याची विनंती केली. ग्रामपंचायती समोरील हॉटेलवर चहा पित असताना तेथे विजय उत्तम गदळे व त्याचे तीन साथीदार आले. त्यांनी येथे काय चालू आहे ? कोण आहेत ? असा विचारले. तेव्हा विजय केंद्रे यांनी या माजी आमदार प्रा. संगीताताई ठोंबरे आहेत, असे सांगितले.
त्यावर त्यांनी ठोंबरे यांना तुम्ही येणाऱ्या विधानसभेला तुतारी कडून लढणार आहात का ?, अशी विचारणा केली. त्यांनी याबाबत अद्याप कोणताही विचार किंवा चर्चा नसल्याचे सांगितले. त्यानंतर विजय गदळे यांने अश्लिल भाषेत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तेव्हा तेथील उपस्थित कार्यकर्त्यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यास बाजूला घेऊन गेले. त्यानंतर संगीताताई ठोंबरे आणि कार्यकर्ते गाडीत बसून निघू लागले असता विजय याने त्यांच्या गाडीवर दगड मारला. या अचानक झालेल्या हल्ल्यात चालकाच्या बाजुची काच फुटून तो दगड आत बसलेल्या ठोंबरे यांच्या चेहऱ्याला लागला. तर चालक किशोर मोरे यांच्या हाताला लागल्याने ते जखमी झाले.
माजी आमदार ठोंबरे यांच्यावर हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रकार गंभीर आहे. त्यांना रात्री उशिरा पर्यंत पोलीस ठाण्यात ताटकळत थांबावे लागले. याबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांतून रोष व्यक्त केला जात आहे.
या हल्ल्यात गाडीचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी केज पोलिसांत विजय उत्तम गदळे (रा. रा. वडमाऊली दहीफळ) आणि त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू वाघमारे करीत आहेत.
विधानसभा निवडणूक लढविणार असल्याने आणि मतदारसंघात संपर्क वाढविला असल्याने अनेकजण बेचैन झाले आहेत. हा हल्ला पूर्वनियोजित होता. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. एका माजी आमदारांवर जर असे जीवघेणे हल्ले होत असतील. तर राज्यात कायद्याचा धाक राहिलेला आहे का ? यावर शंका निर्माण होत आहे.- प्रा. संगीता ठोंबरे, माजी आमदार