माजलगाव : अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणे आणि तिच्या गर्भधारणेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात पतीवर बलात्कार आणि पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गतही कारवाई करण्यात आली असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील पात्रुड येथील रहिवासी राजाभाऊ आवाड व यमुना आवाड यांनी आपल्या अल्पवयीन मुलीचा विवाह परभणी जिल्ह्यातील बोरी येथील आकाश किसन दळवी (वय २२) याच्याशी लावून दिला होता. आकाशचे वडील किसन दळवी व आई सखुबाई दळवी यांचाही या विवाहात सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.
दरम्यान, ९ जून रोजी संबंधित मुलीला पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने तिला उपचारासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीदरम्यान मुलगी अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. तसेच ती गर्भवती असल्याचेही स्पष्ट झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
यानंतर माजलगाव ग्रामीण पोलिसांनी मुलीच्या वयाची पडताळणी केली असता ती कायदेशीर विवाह वयापेक्षा कमी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मुलीचे आई-वडील, सासू व सासरे यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती झाल्याच्या आरोपावरून पती आकाश दळवी याच्याविरुद्ध बलात्कार तसेच पॉक्सो कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून सर्व आरोपींची भूमिका तपासली जात आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन धोरणाचार्य तथा पिंक पथक प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
बालविवाह विरोधात कायदा पुन्हा चर्चेत
या घटनेमुळे ग्रामीण भागात अजूनही काही ठिकाणी बालविवाहाच्या प्रथा सुरू असल्याचे वास्तव पुन्हा समोर आले आहे. अल्पवयीन मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि भवितव्य धोक्यात आणणाऱ्या अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. प्रशासनानेही नागरिकांना बालविवाहासारख्या बेकायदेशीर प्रथांविरोधात पुढे येऊन माहिती देण्याचे आवाहन केले आहे.