Firing in Beed city over minor dispute
बीड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील इमामपूर रोडवर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी रात्रीच्या वेळी गोळीबाराची घटना घडली. प्रारंभी दोन गटांत झालेल्या वादानंतर आणखी एक गट त्या ठिकाणी आला, त्यातील एकाने गाडीतून उतरत हवेमध्ये चार राऊंड फायर केले. या सर्व घटनाक्रमात एकजण जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्रामीण पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल होताच एकाला अटक करण्यात आली आहे.
बीड शहरातील इमामपूर रोडवर असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ काही तरुण थांबले होते. त्या ठिकाणी आलेल्या दुसऱ्या गटाशी त्यांचा वाद झाला. त्यातील एका तरुणाने आणखी काहीजणांना फोन करून तेथे बोलावून घेतले.
यानंतर तीस ते पस्तीस तरुण त्या ठिकाणी गाड्यांमधून दाखल झाले. यातील एकाने गाडीमधून उतरत चार राऊंड हवेत फायर केले. या प्रकरणी शेख मोहम्मद साद शेख यांच्या तक्रारीवरून सफवान खान महेबुब खान, सय्यद साद, फरदीन पठाण, अखलाख यांच्यासह इतर सहा ते सात जणांच्या विरोधात बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, घटनेनंतर फरदिन पठाण (24, रा. पेठबीड) याला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे तर गोळीबार करणारा सफवान खान हा फरार झाला आहे. सफवान खान याच्यावर यापूर्वी देखील वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. तसेच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच्यासोबतचे त्याचे छायाचित्र देखील समोर आले आहेत. सफवान खान याची या परिसरात दहशत असल्याचेही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे.
अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि बाळराजे दराडे हे करत आहेत. इमामपूर रोडवर पेट्रोल पंपासमोर घडलेल्या या घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आला आहे. यामध्ये मोठा जमाव या ठिकाणी जमल्याचे दिसून येत आहे तसेच आरोपी एका गाडीतून उतरल्यानंतर फायरिंग करत असल्याचे देखील यामध्ये कैद झाले आहे. हा महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. सीसीटीव्ही पोलिसांनी ताब्यात घेतला असून आता या सर्व घटनाक्रमात हा महत्वाचा पुरावा ठरणार आहे.