बीड पुढारी वृत्तसेवा: परळी तालुक्यातील नाथरा या गावी उसने पैसे न दिल्याच्या कारणावरून एकाने फायरिंग केल्याची घटना घडली. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही दरम्यान या प्रकरणात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात महादेव मुंडे यांच्या फिर्यादीवरून प्रकाश मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मनीष पाटील हे करत आहेत. दरम्यान नाथरा हे भाजप नेत्या पंकजा मुंडे व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे गाव असून या ठिकाणी गोळीबाराची घटना घडल्याने याची चर्चा होत आहे.
परळी तालुक्यातील नाथरा येथील महादेव मुंडे यांना प्रकाश मुंडे या सेतू सुविधा केंद्र चालकाने उसने पैसे मागितले होते परंतु ते देण्यास महादेव मुंडे यांनी नकार दिला यामुळे प्रकाश मुंडे यांनी आपल्याकडील गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची फिर्याद महादेव मुंडे यांनी दिली आहे. यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आता आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष पाटील यांनी दिली आहे.