रेणापूर, पुढारी वृत्तसेवा : हाताला काम मिळावे म्हणून जवळपास एक हजार ऊसतोड कामगारांनी आपली लहान मुले वयोवृद्ध आजी आजोबांच्या स्वाधीन करून तांडे सोडले. अशा या हनमंतवाडी तांड्यातील नागरिकांची गेल्या १५ वर्षांपासून पाण्यासाठी होणारी पायपीट आणि डोक्यावरला हंडा काही उतरला नाही. या गावची नळयोजना म्हणजे एक प्रकारचे मृगजळच ठरलेले आहे.
रेणापूर तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. उन्हामुळे पाण्याच्या पातळीत घट होत असून तांडे - वाड्यांसह इतर गावाना त्याचे चटके बसू लागले आहेत. नागरीकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची पाळी आली आहे. रेणापूर पंचायत समिती व तहसील प्रशासनाने तालुक्यातील २३ गावांसाठी ३२ विहिरींचे अधिग्रहण केले आहेत. इतर कांही गावातील परिस्थितीहि दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे.
केंद्र सरकारच्या " जल जीवन मिशन " योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात नळाव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचे सांगितले जाते. परंतु रेणापूर तालुक्यातील दिड दोन हजार वस्ती असलेल्या हनमंतवाडी व हणमंतवाडी तांडा येथील नागरीकांना नळाचे पाणी कसे असते हेच माहिती नाही. गावात पाणी यावे यासाठी रेणापूर नगर पंचायतीने पाच किमीची पाईपलाईन केली गावात पाण्याची टाकीही बांधली परंतु नळाचे पाणी काही आले नाही.
गावात असलेले सर्व बोअर पाण्याअभावी बंद पडले आहेत. विहिरीनी तळ गाठला आहे गेल्या पंधरा वर्षापासून पिण्याचे व सांडपाणी विकतच घ्यावे लागत आहे. या लोकांना केंद्र सरकारच्या " जल जीवन मिशन" योजनेचा लाभ कधी मिळेल असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
याच तांड्यात आम्ही लहानाचे मोठे झालो, पण पाणी टंचाई काही आमचा पिच्छा सोडत नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने आम्हांला दररोज हंडाभर पाण्यासाठी पहाटे उठून वणवण भटकावे लागत आहे. सततची भटकंती आता सहन होत नाही. जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वरचेवर गंभीर बनत चालला आहे. अशा प्रतिक्रिया कांही महिलांनी व्यक्त केल्या.
हनमंतवाडी तांड्यातील ५० टक्के ऊसतोड कामगार ऊसतोडणीसाठी इतरत्र गेले आहेत. त्यांची मुले व वृद्ध आईवडील गावातच आहेत. या लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी रेणापूरच्या नगर पंचायतीने गावात ठिकठिकाणी पाच ते दहा हजार लिटर पाण्याच्या टाक्या बसवून त्यात टँकरने पाणीपु-रवठा करावा अशी मागणी माजी उपसरपंच वसंतराव राठोड यांनी केली आहे.