बीड : दुष्काळ , अवकाळी पाऊस नापिकी या अस्मानी संकटासोबतच शेतीमालाला भाव नसणे , सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागत आहे. शेतीमालाला हमीभाव नसुन उत्पादन खर्च अधिक आणि उत्पन्न कमी असुन सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असुन आवश्यक उपाययोजना करण्यात यावी. बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी अशोक मल्हारी ढास यांनी एका एकरात तब्बल दीड लाख रुपये खर्च करून आलेलं टोमॅटो पिक विक्रीसाठी परवडत नसल्याने झाडावरचं शेतात खराब होऊ लागले आहे.
त्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी तसेच शेतकऱ्यांप्रती वारंवार असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निषेधार्थ लक्ष्यवेधी लाल चिखल आक्रोश आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१५ मंगळवार रोजी हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात टोमॅटो तुडवत करण्यात आले.
जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आंदोलनात टोमॅटो उत्पादक शेतकरी अशोक ढास,शेख युनुस, सुदाम तांदळे,शिवशर्मा शेलार, शेख मुबीन, पांडुरंग हराळे, प्रदीप औसरमल, गौतम कोरडे,आप जिल्हाध्यक्ष अशोक येडे आदी सहभागी होते.
शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. सरकारची ऊदासीनता याला जबाबदार असुन शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. सरकारचे आर्थिक धोरण शेतकऱ्यांना मारक ठरत आहे. शेतक-यांच्या शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.
बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी अशोक मल्हारी ढास यांनी तब्बल दिड लाख रुपये खर्चून टोमॅटोचे पिक आणले. मात्र विक्रीसाठी परवडत नसल्याने टोमॅटो शेतातच झाडावर पिकुन गळु लागले आहेत. त्यांच्या शेतातील २०० किलो टोमॅटो लाल चिखल आक्रोश आंदोलनासाठी वापरण्यात आले असुन अशोक ढास आंदोलनात सहभागी होते.
अस्मानी आणि सुलतानी संकटांनी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे पिक विमा प्रकरणी भिका-याशी तुलना करतात. तर कधी शेतकरी कर्जमाफीचा पैसा शेतीत न गुंतवता साखरपुडा आणि लग्नावर खर्च करतात तर कधी शेतकरी जास्त उत्पादन करत असल्याने शेतमालाला भाव नाही असे वारंवार असंवेदनशील वक्तव्य करतात. त्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी याबाबत समज द्यावी आणि त्यांच्यात सुधारणा होत नसेल तर त्यांना कृषी मंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.