Beed News : फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज... file photo
बीड

Beed News : फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज...

दुष्काळी परिस्थितीत ‘फळबागांचे संरक्षण व व्यवस्थापन’ कार्यशाळा; शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा...

पुढारी वृत्तसेवा

Farmers need urgent assistance to save their orchards

कडा : पुढारी वृत्तसेवा अपुरा पाऊस आणि निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे फळबागा वाचविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन, ठिबक सिंचनाचा वापर आणि फळझाडांचे योग्य व्यवस्थापन करून बागा जगविण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने आष्टी येथील मोरेश्वर मंगल कार्यालयात ‘दुष्काळी परिस्थितीत फळबागांचे संरक्षण व व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.

कृषी विज्ञान केंद्र, खामगाव (ता. गेवराई) येथील तज्ज्ञ डॉ. गणेश मंडलिक यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. दुष्काळात फळबागांना आवश्यक पाणी किती आणि कसे द्यावे, पाण्याची बचत कशी करावी, झाडांची पाण्याची गरज कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, तसेच बागेचे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

पाच हजार झाडांची नोंदच नाही!

कार्यशाळेत मार्गदर्शनासोबतच शेतकऱ्यांनी आपल्या प्रत्यक्ष अडचणी प्रशासनासमोर मांडल्या. धोपटवाडी येथील कल्याण पवार यांच्या सुमारे पाच हजार झाडांची कृषी विभागाकडे नोंद झालेली नसल्याने ई-पीक पाहणी करून त्याची नोंदणी करण्याची मागणी करण्यात आली.

धनंजय गर्जे यांच्या डाळिंब बागेसाठी किमान दोन लाख रुपये अनुदान मिळावे, अशी मागणी करण्यात आली. पांढरवाडी येथील पाचपुते यांनी फळबाग वाचविण्यासाठी किमान तीन लाख रुपयांच्या मदतीची गरज असल्याचे सांगितले.

मोसंबी बाग जगविण्यासाठी ७०-८० हजारांची गरज...

पाडळी येथील अशोक इंगळे यांनी मोसंबी बाग वाचविण्यासाठी पाण्याची तातडीने उपलब्धता होणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यासाठी सुमारे ७० ते ८० हजार रुपयांची गरज असल्याची व्यथा त्यांनी मांडली.

याशिवाय ठिबक सिंचनासाठी डीबीटी योजनेंतर्गत मंजुरी आणि अनुदानाची रक्कम तातडीने मिळावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दिल्लीपर्यंत पाठपुरावा करणार आमदार धस...

शेतकऱ्यांच्या या सर्व मागण्या आणि अडचणी गांभीर्याने घेऊन त्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. केंद्रीय मंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्यासाठी दिल्लीला जाण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. नुकत्याच झालेल्या दुष्काळी पाहणीनंतर राज्यात दुष्काळ जाहीर करून दिवाळीपूर्वी मदत देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे फळबाग धारकांनी खचून जाऊ नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास उपस्थितांना देण्यात आला.

कार्यशाळेस तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, गांगर्डे, आंधळे यांच्यासह सभापती संजय ढोबळे, बद्रीनाथ जगताप, परमेश्वर शेळके, विष्णुपंत चव्हाण, रमेश गावडे, रामदास हमे, केशव रसाळ तसेच अन्य मान्यवर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT