Fake Document Racket : बीडमध्ये बनावट कागदपत्रांचे रॅकेट उघड; चौघांवर गुन्हा दाखल file photo
बीड

Fake Document Racket : बीडमध्ये बनावट कागदपत्रांचे रॅकेट उघड; चौघांवर गुन्हा दाखल

जमिनीच्या व्यवहारासाठी बनावट आधार, पॅन कार्डचा वापर

पुढारी वृत्तसेवा

Fake document racket busted in Beed; case registered against four individuals

बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड शहरात बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर ओळखपत्रांच्या आधारे जमिनीचे खरेदीखत करून मालमत्तेवर बेकायदेशीर हक्क मिळविण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून झालेल्या व्यवहाराची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.ब

शेख अकबर शेख इस्माईल भाई (रा. रोशनपुरा, बालेपीर, बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३४०(२), ३३६(३) व ३ (५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, त्यांच्या वडिलांच्या नावाचा गैरवापर करून संगणकीय माध्यमातून बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे तयार करण्यात आली. त्यानंतर बनावट ओळख निर्माण करून संबंधित जमिनीचे खरेदीखत करण्यात आले आणि मालमत्तेवर बेकायदेशीर हक्क सांगण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या व्यवहारामुळे फिर्यादीला मोठे आर्थिक व कायदेशीर नुकसान झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात मजहर खान हबीब खान, मोहम्मद युसुफ खान अहमद खान, शेख युसुफ शेख शब्बीर आणि अंबरीश काटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बापूराव मिसाळ करीत आहेत.

फिर्यादीने यापूर्वी या व्यवहाराबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडेही तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संबंधित व्यवहार विरोधात दिवाणी दावा दाखल करण्यात आला असून, आता त्याच प्रकरणात फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

दरम्यान, तपासादरम्यान बनावट आधार कार्ड, खरेदीखतावरील स्वाक्षऱ्या, अंगठ्याचे ठसे, छायाचित्रे यांची न्यायवैद्यक प्रयोगशाळेमार्फत (एफएसएल) तपासणी करण्यात यावी, तसेच उपनिबंधक कार्यालयातील संबंधित अभिलेख आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करून संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष व सखोल तपास करावा, अशी मागणी फिर्यादीने केली आहे. या प्रकरणाच्या तपासाकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे, ओळखपत्रे तसेच इतर पुराव्यांची पडताळणी सुरू आहे. आवश्यकतेनुसार संबंधित कागदपत्रे न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे (एफएसएल) तपासणीसाठी पाठविण्यात येतील. तपासात जे दोषी आढळतील त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल."
- बापूराव मिसाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT