बीड : सरपंच देशमुख हत्या व खंडणी प्रकरणा नंतर आणखीन एका प्रकरणी आठवले गँगच्या विरूद्ध मकोका लागणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले असून बनावट नोटा छपाई प्रकरणी बीड पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
तीन महिन्यापूर्वी बीड शहरात बनावट नोटा छपाई करणारी गँग असल्याचे उघडकीस आले होते. ही छपाई करणारा मुख्य आरोपी मनिष क्षीरसागर याला स्थानिक गुन्हा शाखेने पकडले मात्र ते दुसर्या गुन्ह्यात, पोलिस कस्टडी मध्ये आरोपीची चौकशी करताना पोलिसांना हे रॅकेट अट्टल गुंड असलेली आठवले गँग हे रॅकेट चालवत असल्याचे पुरावे तसेच त्या संबधीचे धागेदोरे मिळाले. यावरून बीड शहर पोलिसांनी अक्षय आठवले आणि ओंकार सवाई यांना देखील अटक केली. यावेळी मनिष क्षीरसागर याने बनावट नोटा छपाईचा कारखाना कशा पध्दतीने चालविला जात होता तसेच आठवले गँग ह्यासाठी कशा पध्दतीने ते बाजारात चलनात आणत होते याचे सर्व पुरावे दिले. याशिवाय यापूर्वी पकडलेल्या तीन आरोपींनी देखील छपाई करण्यासाठी लागणारे साहित्य तसेच छपाई केल्यावर ते चलनात आणण्यासाठी करण्यात येणारे नेटवर्किग या बाबत पोलिसांना माहिती दिली असल्याचे तपास आधिकारी शितलकुमार बल्लाळ यांनी 'पुढारी' वृत्त समूहाशी बोलताना सांगितले.
दरम्यान बनावट नोटा छपाई मध्ये संघटित गुन्हेगारी ही उघडकीस आली असून बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी या गुन्ह्यात मकोका लावण्या संबंधित पोलीस महासंचालक यांच्याकडे प्रस्ताव पाठविल्याचे समजले असून एक दोन दिवसात या प्रस्तावास महासंचालक मान्यता देतील.
सरपंच देशमुख हत्या व खंडणी प्रकरणानंतर बीड पोलीस चांगलीच अॅक्शन मोडवर आली असून जिल्ह्य़ातील संघटित गुन्हेगारी मोडकळीस काढण्यासाठी आवश्यक ती पावले उचलताना दिसत आहेत. बनावट नोटा छपाई प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून अजून काही आरोपी मिळण्याची शक्यता तपास आधिकारी शितलकुमार बल्लाळ यांनी व्यक्त केली आहे.