Fact Check - Is plastic rice being sold on ration? What exactly is this rice?
स्वस्तधान्य दुकानात या तांदळामुळे ग्राहकांमंध्ये गाेंधळ Pudhari Photo
बीड

Fact Check - रेशनवर प्लास्टिकचा तांदूळ विकला जात आहे का? हा तांदूळ नेमका कोणता आहे?

पुढारी वृत्तसेवा

गौतम बचुटे/केज

केज तालुक्यातील एका स्वस्तधान्य दुकानावर ग्राहकांनी खरेदी केलेल्या तांदळात काही तांदूळ हे प्लास्टिक सदृश्य आणि कृत्रिम दिसत असल्याने गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र हे प्लॅस्टिक तांदूळ नसून हे फोर्टिफाईड तांदूळ आहेत. यात भरपूर प्रमाणात शरीराला पोषण द्रव्य असतात. ते आरोग्याला फायदेशीर असल्याने कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही.

या बाबतची अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील लाखा येथील एका पर्यायी व्यवस्था असलेल्या स्वस्तधान्य दुकानातून ग्राहकांना वितरीत केलेल्या तांदळात प्लास्टिक सदृश्य आणि नैसर्गिक वाटत नसलेले कृत्रिम तांदूळ आढळून आले. त्यामुळे गावकरी घाबरुन गेले. त्या गावातील लोकांनी ही माहिती उपसरपंच अजिज कच्छी यांना दिली. उपसरपंच अजित कच्छी यांनी या तांदळाचे नमुने प्रसिद्धी माध्यमांसमोर दाखविले.

या तांदळाबाबत माहिती अशी की, फोर्टीफाईड तांदूळ बनावट किंवा आरोग्यास अपायकारक नसून मानवी आरोग्य आणि शरिसाठी लागणारे पोषण द्रव्य या तांदळात मोठ्या प्रमाणात असतात. मानवी आरोग्यास हा तांदूळ अत्यंत पोषक व फायदेशीर आहे. या बाबत समाजात जनजागृती होणे आवश्यक असून पुरवठा विभागाने यात पुढाकार घ्यायला हवा. म्हणजे शंकेचे निरसन होईल. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये किंवा या तांदळा बाबत कोणी गैरसमज पसरवू नये.

फोर्टिफाईड तांदुळ कसा तयार केला जातो

फोर्टिफाईड तांदळात सूक्ष्म पोषक तत्त्वे, विटामिन्स व खनिजांची मात्रा कृत्रिमरीत्या मिसळलेली असते. प्रथम तांदळाची भुकटी तयार केली जाते आणि त्यात हे सर्व पोषक तत्त्वे मिसळली जातात. या मिश्रणाला पुन्हा तांदळाचा आकार दिला जातो. यालाच फोर्टिफाईड तांदूळ म्हणतात. हा तांदूळ १०० किलोमध्ये १ किलो मिसळून वितरित केला जातो.

फोर्टिफाईड तांदळात काय असते ?

फॉर्टीफाईड तांदळात लोह खनिज, फॉलीक ॲसिड, व्हिटॅमिन बी-१२ हे घटक मिसळलेले असतात

यातील घटकाचे मानवी आरोग्यासाठी फायदे :-

  • लोहखनिज - अशक्तपणा व तांबड्या पेशींची कमतरता दूर करते

  • फॉलिक ॲसिड - गर्भाचा विकास व नवीन पेशी बनवते.

  • विटामिन बी १२ - मज्जा संस्थेचे कार्य सुरळीत सुरू ठेवते.

SCROLL FOR NEXT