Beed News  
बीड

Beed News | महावितरणचा परळीत बेफिकीर कारभार ; अव्वाच्या सव्वा बिलांनी नागरिक हैराण

घरगुती मीटर असताना कमर्शियल दर लावणे ही सरळसरळ अन्यायकारक वसुली

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ : परळी शहरात महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता कार्यालयाच्या कारभाराबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चुकीची, वाढीव व अवास्तव वीज बिले हा जणू नित्याचा प्रकार बनला आहे. घरगुती मीटरला कमर्शियल दराने बिल आकारणे, सौर ऊर्जेचे युनिट जमा असतानाही मोठी रक्कम वसूल करणे, बिल भरूनही वीजपुरवठा खंडित करणे आणि स्मार्ट मीटरमुळे अचानक वीज तोडली जाणे अशा तक्रारींनी नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला आहे.

घरगुती मीटरला कमर्शियल बिल; ज्येष्ठ नागरिकांचा उपोषणाचा इशारा

हालगे गल्ली परिसरातील ज्येष्ठ नागरिक सुमंत दत्तात्रय देशमुख यांना निवासी भागात राहत असतानाही कमर्शियल दराने वीज बिल आकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कोणताही व्यावसायिक वापर नसताना वाढीव दर लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वारंवार अर्ज करूनही दुरुस्ती न झाल्याने त्यांनी थेट महावितरण कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.

त्यांच्या मते, “घरगुती मीटर असताना कमर्शियल दर लावणे ही सरळसरळ अन्यायकारक वसुली आहे. बिल दुरुस्त न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही.” सौर ऊर्जा प्रकल्पांनाही झटका; ७२ हजार युनिट जमा तरी आमदारांच्या स्वीय सहाय्यकाला ५४ हजारांचे बिल परळीत सौर ऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांनाही दिलासा मिळालेला नाही. आमदारांच्या स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्या सोलर प्रकल्पातून तब्बल ७२ हजार रुपयांच्या समतुल्य वीज युनिट जमा असतानाही त्यांना ५४ हजार रुपयांचे बिल देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कल्पेश बियाणी, अनंत बिनवडे, चंद्रप्रकाश लोढा यांसारख्या अनेक ग्राहकांनीही सोलर युनिट जमा असूनही नियमित किंवा अवास्तव बिले येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. काहींना तर लाख रुपयांच्या घरात बिल आल्याचा आरोप आहे.हा प्रकार केवळ तांत्रिक बिघाड आहे की प्रणालीतील गंभीर त्रुटी, याबाबत प्रशासन मौन बाळगून आहे.

बिल भरूनही वीज खंडित; अतिरिक्त रक्कम भरल्यावरच जोडणी

शिवाजीनगर येथील एका ग्राहकाने ३३ हजार रुपयांचे बिल भरूनही वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची तक्रार केली आहे. पावत्या दाखवूनही दिवसभर हेलपाटे मारावे लागले. अखेर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांकडे धाव घेतल्यानंतर पुन्हा ५ हजार रुपये भरून घेतल्यावरच वीजपुरवठा सुरू करण्यात आल्याचा आरोप आहे.ही बाब केवळ प्रशासनातील समन्वयाच्या अभावाकडे निर्देश करते की जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय, असा सवाल नागरिक करत आहेत.

स्मार्ट मीटर की ‘स्मार्ट’ त्रास?

परळी शहरात सुमारे २१ हजार वीज ग्राहक असून त्यापैकी सुमारे ५ हजार ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. जानेवारीपासून सुरू असलेल्या या प्रक्रियेमुळे तांत्रिक अचूकता वाढेल, असा दावा महावितरणकडून करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात बिल थकित राहिल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित होतो, बिल भरल्यानंतरही २ ते ४ तास वीज येत नाही, मीटरवर लाईट दिसते पण घरात वीज नसते अशा तक्रारी वाढल्या आहेत. ऑनलाइन व्यवसाय, शिक्षण व घरगुती कामांवर त्याचा थेट परिणाम होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

कार्यालयीन ढिसाळपणा; ग्राहकांची गर्दी, अधिकारी गैरहजर

चुकीच्या बिलांच्या दुरुस्तीसाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता कार्यालयात ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, वरिष्ठ अधिकारी बैठकीसाठी बाहेरगावी असल्याचे सांगितले जाते. कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात, प्रत्यक्ष रीडिंग न घेता कार्यालयातूनच बिले तयार होतात, अशी गंभीर तक्रार आहे. काही ग्राहकांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याचेही समोर आले आहे. “दुरुस्ती वेळेत होत नाही, समाधानकारक माहिती दिली जात नाही,” अशी सर्वसामान्यांची भावना आहे.

प्रशासनावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

परळीत वाढत्या तक्रारींमुळे महावितरणच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तांत्रिक सुविधा, स्मार्ट मीटर आणि सोलर प्रकल्प यांचा उद्देश ग्राहकांना सुलभ सेवा देणे हा असताना प्रत्यक्षात मात्र आर्थिक व मानसिक त्रास वाढत असल्याचे चित्र आहे. चुकीची व वाढीव बिले, विनासूचना वीज खंडित करणे, सौर युनिटचा योग्य हिशेब न लावणे आणि तक्रारींना प्रतिसाद न देणे या सर्व बाबींची सखोल चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. यंत्रणा स्मार्ट असली तरी ती मानवहिताची असावी, हीच परळीकरांची ठाम भूमिका आहे. आता महावितरण प्रशासन या संतापाची दखल घेऊन ठोस पावले उचलणार का, हा खरा प्रश्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT