Dreams of a railway job; 24 lakh fraud
रवी जोशी
परळी वैजनाथ : रेल्वेत गेटमन पदावर नोकरी लावतो, असं सांगत परळीतील २१ वर्षीय युवकाची तब्बल २४ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या फसवणुकीत बनावट नियुक्तीपत्र, बनावट ट्रेनिंग, खोटं मेडिकल, एवढंच नव्हे तर रेल्वे क्वार्टर मिळवण्यासाठीही पैसे उकळण्यात आले. महादेव भरत मुंडे या तरुणाने अखेर मुंबईत रेल्वे कार्यालयात दाखल होताच, ही ऑर्डर खोटी असल्याचं स्पष्ट झालं आणि फसवणुकीचा मोठा भांडाफोड झाला.
महादेव मुंडे हा परळी पंचशीलनगर येथे राहणारा तरुण, नोव्हेंबर २०२३ मध्ये रेल्वे नोकरीच्या आमिषाने एका साखळी फसवणुकीचा बळी ठरला. काशीनाथ घुगे (रा. परळी) याने दिल्लीला नेऊन मेडिकल करवले, आणि सचिन वंजारेच्या खात्यावर पहिली रक्कम पाठवण्यात आली. नंतर बनावट गेटमन पदाचे नियुक्तीपत्र दिले गेले.
महादेवला अमृतसर येथे गेट क्र. २६ वर ट्रेनिंग सुरू असल्याचा बनाव रचला गेला. दरम्यान, रेल्वे क्वार्टर, प्रशिक्षण साहित्य, पदस्थापना प्रक्रिया, फायनल मेडिकल, अशा विविध कारणांनी वेळोवेळी संजय ठाकूर,एस. के. सिंग, सुरजकुमार सिंग, प्रेमकुमार यांच्यासह इतरांनी मिळून पैशांची मागणी सुरूच ठेवली. हीच योजना महादेवच्या चुलत मामालाही टीसी पदासाठी नोकरी मिळेल, असे सांगून त्यांच्याकडूनही १४.७० लाख रुपये घेतले गेले. शेवटी महादेवचे नातेवाईक मुंबई CSTM येथे नियुक्तीपत्र घेऊन हजर झाले असता, रेल्वे अधिकाऱ्यांनी ही ऑर्डर बनावट असल्याचे सांगताच सर्व प्रकरण बाहेर आले.
या प्रकरणी काशीनाथ घुगे, सचिन वंजारे (परळी), संजय ठाकूर (दिल्ली), सुरजकुमार सिंग (अमृतसर), प्रेमकुमार (पत्ता अज्ञात) यांच्याविरुद्ध परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल शिंदे करत आहेत.