अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भूलशास्त्र (अनॅस्थेशिया) विभागप्रमुख डॉ. अभिमन्यू तरकसे यांचा आज सकाळी काळवटी साठवण तलावात पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. नियमित पोहणारे आणि शारीरिक तंदुरुस्तीबाबत जागरूक असलेल्या डॉ. तरकसे यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण अंबाजोगाई शहरासह वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
ही घटना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली. सकाळी नेहमीप्रमाणे डॉ. तरकसे हे एकटेच पोहण्यासाठी काळवटी तलावावर गेले होते. पोहताना सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्यांनी कमरेला रिकामी बाटली बांधली होती. मात्र काही वेळानंतर तलावातील सांडव्याजवळ एक मृतदेह तरंगताना काही नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी जवळ जाऊन पाहणी केली असता तो मृतदेह डॉ. अभिमन्यू तरकसे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, सहकारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी काळवटी तलावाकडे धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलविण्यात आला.अत्यंत मनमिळाऊ स्वभाव, रुग्णांविषयीची संवेदनशीलता आणि विषयातील प्रभुत्व यांच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच सहकाऱ्यांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली होती.
पुढे ते भूलशास्त्र विभागप्रमुख पदापर्यंत पोहोचले. त्यांच्या अकाली निधनाने वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.डॉ. तरकसे यांना पोहताना अचानक हृदयविकाराचा झटका आला की अन्य काही कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
विशेष म्हणजे, अवघ्या सहा महिन्यांपूर्वी निष्णात जलतरणपटू विश्वनाथ बुरांडे यांचाही याच तलावात बुडून मृत्यू झाला होता. दरवर्षी दोन ते तीन जणांचा या तलावात बळी जात असल्याची बाब चिंताजनक मानली जात आहे. अनेक कुटुंबांचे आधारस्तंभ अशा दुर्घटनांमध्ये गमावले जात असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
काळवटी तलाव ठरतोय ‘डेथ पॉइंट’?
पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेल्या काळवटी साठवण तलावात गेल्या काही वर्षांत पोहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र सुरक्षिततेची कोणतीही प्रभावी यंत्रणा नसल्याने हा तलाव जीवघेणा ठरत असल्याची चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे.
तलावावर पोहण्यास निर्बंध : अश्विनी जिरंगे
काळवटी तलावावर पोहण्यास येऊन झालेल्या सततच्या घटना लक्षात घेता या ठिकाणी पोहण्यास निर्बंध घालावेत, एवढेच नाही तर अशा इतर धोकादायक भागांमध्ये सूचना फलक लावावेत, तसेच सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने संबंधित लघु पाटबंधारे विभागास सूचना केल्या असल्याचे अंबाजोगाईच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे सोनावणे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.