बीड, पुढारी वृत्तसेवा
हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फड, माणिक फड, बाळासाहेब सोनवणे या तिघांसह गुन्हा दाखल असलेल्या ७४ जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी ही कारवाई केलीय.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर जिल्ह्यातील १२८१ शस्त्र परवान्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. कुणालाही शस्त्र परवाना दिल्याचा आरोप करत हे परवाने रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. या अनुषंगाने पिस्टलसह फोटो, व्हिडीओ असणाऱ्या कैलास फड, माणिक फड, बाळासाहेब सोनवणे यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
तर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या २३२ जणांचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकारी यांना पाठवला होता. या सर्वांना नोटीस देऊन सुनावणी घेण्यात आली. यातील ७४ जणांचा परवाना जिल्हाधिकारी यांनी रद्द केला आहे. तर उर्वरित परवानाधारकांची पडताळणी सुरु आहे. आतापर्यंत ३०३ परवाने रद्द केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गरज नसताना घेण्यात आलेल्या शस्त्र परवानाधारकांना जिल्हाधिकाऱ्यांनी दणका दिला आहे.